
‘कृती समिती’तर्फे जनजागृती सुरू
पुणे, ता. ११ : बालभारती ते पौड फाटा या प्रस्तावित रस्त्याच्या विरोधात सुरू असलेल्या ‘टेकडी वाचवा, पुणे वाचवा’ अभियानाने आता शहरात जोर धरला आहे. यासाठी नागरिकांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या वेताळ टेकडी बचाव कृती समितीतर्फे शहराच्या वेगवेगळ्या भागात जनजागृती उपक्रम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (ता. ११) सायंकाळी साडेसात वाजता पौड रस्ता आणि पत्रकारनगर येथे समितीच्या सदस्यांनी हातात फलक घेत अभियान राबविले. तसेच या वेळी गाणे व घोषणाबाजी करत लोकांना या अभियानामागची भूमिका सांगण्यात आली. तसेच १५ एप्रिल रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले. अभियानाच्या सुरुवातीला पाच ते सहा सदस्यांचा यामध्ये सहभाग होता. मात्र आता सातत्याने लोकांचा सहभाग वाढत असून, त्यांच्यापर्यंत टेकडी वाचविण्याचा संदेश पोचत असल्याचे समितीतील सदस्यांनी सांगितले.