कविता करण्यासाठी मातृहृदय लागते : डॉ. गुंडी

कविता करण्यासाठी मातृहृदय लागते : डॉ. गुंडी

पुणे, ता. १९ : कविता हा शब्द स्त्रीलिंगी आहे, हे मला वैशिष्ट्यपूर्ण वाटते. कारण कविता करायला मातृहृदय असावे लागते, असे मत ज्येष्ठ कवयित्री आणि समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी यांनी व्यक्त केले. मी आणि जग, यामधील स्पर्शरेषा म्हणजे माझी कविता आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावर्षीपासून एका ज्येष्ठ आणि एका नवोदित कवयित्रीला देण्यात येणाऱ्या सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्काराचे वितरण बुधवारी (ता. १९) केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या समारंभात डॉ. गुंडी आणि नवोदित कवयित्री हर्षदा सुंठणकर यांना या पुरस्काराने सन्मानित केले. याप्रसंगी ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे, माजी आमदार अनंत गाडगीळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार आदी उपस्थित होते.

काकडे म्हणाल्या, "पुरस्कार केवळ लेखनासाठी प्रोत्साहन देत नाही, तर जगण्याचे बळ त्यातून मिळत असते. त्यामुळे अनंत गाडगीळ यांनी हे पुरस्कार देऊन साहित्यिक समाजकार्य केले आहे." सुंठणकर म्हणाल्या, "माझे वडील स्वतः विनोदी लिखाण करत असले तरी त्यांना कविता हा साहित्य प्रकार अतिशय आवडायचा. त्यामुळे लहानपणापासून त्यांच्यामुळे कवितांची आवड मला लागली. आजचा पुरस्कार मला पुढच्या प्रवासाला बळ देणारा आहे."

''कविता ही केवळ शब्दांची आतषबाजी नाही, जीवनाची उपासना आहे. मराठी कवितेची मूळ प्रकृती प्रेमाची आहे. पण आज प्रेमकवितेला प्रतिष्ठा राहिली नाही. केवळ राजकीय भाष्य करणारी, व्यवस्थेवर टीका करणारी कविता, म्हणजेच ती श्रेष्ठ आहे, असे होत नाही'', असे मत प्रा. जोशी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. यामध्ये भरत दौंडकर, नीलम माणगावे, प्रशांत मोरे, डॉ. नीलिमा गुंडी, हर्षदा सुंठणकर आदींनी सहभाग घेतला.
-----
माझी आई, सुनीताबाई गाडगीळ ही भाषेची आणि साहित्याची उत्तम जाणकार होती, कवयित्री होती. पण तिच्या साहित्य विषयक गुणांचे फारसे चीज झाले नाही. तिच्या स्मृती जपण्यासाठी साहित्य विषयक पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. आमचे कुटुंब राजकारण्यांचे असले, तरी साहित्यप्रेम आमच्या तीन पिढ्यांमध्ये आहे.
- अनंत गाडगीळ, माजी आमदार

फोटो नंबर - 38093

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com