भाडेकरू ठेवल्यास सवलत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाडेकरू ठेवल्यास सवलत नाही
भाडेकरू ठेवल्यास सवलत नाही

भाडेकरू ठेवल्यास सवलत नाही

sakal_logo
By

पुणे शहरात २०१९ पासून नव्याने एक लाख ६७ हजार निवासी मिळकतींची नोंद झाली आहे. या मिळकतींमध्ये भाडेकरू राहत असल्यास संबंधित मिळकतधारकास ४० सवलत दिली जाणार नाही. महापालिकेकडून त्याची तपासणी केली जाणार आहे. पोलिसांकडील भाडेकरार व मुद्रांक शुल्क कार्यालयाकडे झालेले भाडेकरार तपासले जातील.
पुणे महापालिकेकडून ज्या नागरिकांचे एक घर आहे आणि ते स्वतः त्या घरात राहत असतील, तर त्यांना मिळकतकरात ४० टक्के सवलत दिली जाते. राज्य शासनाने ही सवलत काढून घेऊन २०१९पासून शंभर टक्के करवसुली करण्याचे आदेश दिले होते. मात्र यामुळे बेसुमार करवाढ झाल्याने पुणेकरांचे कराच्या ओझ्याने कंबरडे मोडले. मात्र पुणेकरांच्या रोषानंतर राज्य सरकारने ४० टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. २०१९ पासून केली जाणारी वसुली रद्द केली आहे, तर ज्यांच्याकडून थकबाकी वसूल झाली आहे, त्यांची ही कराची रक्कम पुढील बिलांमध्ये समायोजित केली जाईल, असेदेखील स्पष्ट केले आहे.
मिळकतधारक या नवीन मिळकतींत भाडेकरू ठेवणार आहेत, त्यांना ४० टक्क्यांची सवलत दिली जाणार नाही, असेदेखील महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यांच्यासाठी ही सवलत सुरू करण्यापूर्वी महापालिकेकडून प्रत्येक मिळकतीची तपासणी केली जाईल. तसेच या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांकडे असलेले मिळकतीचे भाडेकरार, मुद्रांक शुल्क विभागाकडे झालेले भाडेकरार यांचीदेखील माहिती घेतली जाणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

१ मेपासून बिलवाटप शक्य
पूर्वीच्या मिळकतकराची बिले तयार आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे ४० टक्के सवलतीसह तयार असलेली बिले छपाई करून एक मेपासून वाटप करण्यात येतील व बिल वसुली करणेही शक्य होणार आहे. ज्या नागरिकांनी ४० टक्के वसुलीची थकबाकी भरलेली आहे, तसेच नव्याने नोंदणी झालेल्या एक लाख ६७ हजार मिळकतींमध्ये स्वतः मिळकत धारक राहत असेल, तर त्यांच्या बिलामध्ये बदल करावे लागणार आहेत. मात्र ही संख्या कमी असल्याने त्याबाबतची कार्यवाही पुढील काही दिवसांत पूर्ण करून त्यांचीदेखील सुधारित बिले वाटप करणे महापालिकेला शक्य होणार आहे, असेही खेमनार यांनी सांगितले.