
मोबाईल जबरदस्तीने लुटणाऱ्या तिघांना अटक
पुणे : पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेणाऱ्या तिघांना चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ऋषभ मच्छिंद्र जाधव (वय १८, रा.धानोरी), रोहित रणवीर सिंग चिडार (वय २०, रा. येरवडा) व जयेश सतीश कांबळे (वय १८, रा. मांजरी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिस कर्मचारी शिवाजी धांडे, श्रीकांत कोद्रे व सूरज जाधव हे तिघे शुक्रवारी मध्यरात्री खराडी बाह्यवळण येथील पेट्रोल पंपाजवळून परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एक दुचाकी भरधाव वेगात मुंढव्याच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना तपासणीसाठी थांबण्यास सांगितले. असे असताना त्यांनी पोलिसांना न जुमानता दुचाकी पुढे नेली. त्यावेळी संबंधित दुचाकीच्या नंबर प्लेटवर चिखल लावण्यात आला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. पोलिसांनी संशयित तरुणाची गाडीची व त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे दोन मोबाईल आढळले. अधिक चौकशी केल्यानंतर एक मोबाईल विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत पायी जाणाऱ्या नागरिकांकडून जबरदस्तीने हिसकावून नेल्याची तसेच दुसरा मोबाईल हा येरवडा येथे रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशांच्या हातातून जबरदस्तीने नेल्याची माहिती मिळाली. संशयित आरोपींवर विश्रामबाग व येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.