अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या टोळीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंमली पदार्थ विक्रीसाठी 
आलेल्या टोळीला अटक
अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या टोळीला अटक

अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या टोळीला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : मध्य प्रदेशातून पुण्यात मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या टोळक्याच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपये किंमतीचा तब्बल एक किलो १०८ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन जप्त करीत दोघांना अटक केली.

आझाद शेरजमान खान (वय ३५) व नागेश्वर राजाराम प्रजापती (वय ३५, दोघेही रा. पिपलखेडी, अलोट, रतलाम, मध्य प्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी मनोजकुमार साळुंखे, मारूती पारधी हे दोघेजण आपली गस्त घालत होते. त्यावेळी मध्य प्रदेशातील काही व्यक्ती पुण्यात अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खराडी येथे सापळा रचून वाहन तपासणी करण्यास सुरुवात केली असता एक दुचाकी खराडीकडून पुण्याच्या दिशेने निघाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्यांना तत्काळ थांबविले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे दोन कोटी २१ लाख ६० हजार रुपये किमतीचे एक किलो १०८ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन, ३१ हजार रुपयांचे ४ मोबाईल व रोख रक्कम आढळली. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला आहे. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलिस कर्मचारी मनोजकुमार साळुंखे, मारूती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.