
आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्यांवर गुन्हा
पुणे, ता. ४ : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. यात पोलिसांनी कारवाई करून दोन महिलांना ताब्यात घेतले. आयुर्वेद उपचार केंद्राच्या मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिंहगड रस्त्यावर माणिकबाग परिसरात एका इमारतीत आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा प्रकार सुरू होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली आणि तेथे छापा टाकला. पोलिसांनी तेथून दोन महिलांना ताब्यात घेतले. तसेच आयुर्वेद उपचार केंद्राचा मालक आणि व्यवस्थापकास ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत मोबाईल संच तसेच रक्कम असा एक लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल तेथून जप्त करण्यात आला.