कडिपत्त्याविना दिली भांडणाला फोडणी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडिपत्त्याविना दिली
भांडणाला फोडणी...
कडिपत्त्याविना दिली भांडणाला फोडणी...

कडिपत्त्याविना दिली भांडणाला फोडणी...

sakal_logo
By

‘‘कडीपत्ता फुकट मिळणं, हा ग्राहकांचा हक्क आहे. मात्र, माझ्याकडून तुम्ही त्याचे पाच रुपये मागता, हे कोठल्या नैतिकतेत बसते. ही काय मोगलाई लागून गेली काय? तुमच्या या नफेखोरी वृत्तीचा निषेध व्यक्त करून तुमच्या दुकानासमोर मी आमरण उपोषणाला बसतो.’’ जांबुवंतरावांनी कोपऱ्यावरील भाजीविक्रेत्याला फैलावर घेतले. पिशवीतून सतरंजी व ‘आमरण उपोषण’ असा बोर्ड बाहेर काढला व दुकानासमोरच ते ठाण मांडून बसले.
‘‘अहो कडीपत्ता काय माझ्या शेतात पिकतो का? पन्नास-साठ रुपयांची भाजी घेतल्यावर कडीपत्त्याची दहा-वीस पानं फुकट देणं मी समजू शकतो. मात्र, तुम्ही माझ्याकडून एक रुपयांचा भाजीपाला विकत घेणार नाही आणि उलट फुकट कडिपत्ता मागणार, हे मला कसं परवडेल?’’ भाजीविक्रेत्याने म्हटले.
‘‘आम्ही भाजीपाला कोठून खरेदी करायचा, हा आमचा अधिकार आहे. तुम्ही आमच्यावर बळजबरी करू शकत नाही. आम्हाला काही निर्णयस्वातंत्र्य आहे की नाही. तुमची ही हुकूमशाही मी चालू देणार नाही.’’ जांबुवंतरावांनी म्हटले आणि ‘कडिपत्ता फुकट न देणाऱ्या भाजीविक्रेत्याचा निषेध’ अशा जोरजोरात घोषणा ते देऊ लागले. त्यामुळे थोड्याच वेळात गर्दी जमा झाली. ‘‘तुम्ही का एवढं ताणून धरलंय. फुकट कडीपत्ता देऊन टाका.’’ एका व्यक्तीने समजावून सांगितले. ‘‘आज कडीपत्ता फुकट दिला तर उद्या भाजीपाला फुकट मागतील. अशा फुकट्या लोकांना मी भीक घालत नाही.’’ भाजीविक्रेताही इरेला पेटला होता.
‘‘फुकट्या कोणाला म्हणताय? आणि भीक घालायची भाषा कोणासमोर करताय? मला भीक नकोय. मला माझा हक्क हवाय. त्या हक्कांसाठीच मी आमरण उपोषणाला बसलोय.’’ जांबुवंतरावांनी म्हटले. ‘‘माझ्या जागेत उपोषण करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही तुमच्या घरी जाऊन उपोषण करा.’’ भाजीविक्रेत्याने सुनावले. मात्र, जांबुवंतराव काही ऐकायला तयार नव्हते. उलट ‘कडीपत्ता फुकट न देणाऱ्या भाजीविक्रेत्याचा निषेध’ ही घोषणा ते अजून मोठमोठ्याने देऊ लागले. बघ्यांची गर्दी होऊ लागल्याने भाजीविक्रीवर परिणाम होऊ लागला. शेवटी नाईलाजाने भाजीविक्रेत्याने कडीपत्ता फुकट दिला. जांबुवंतरावांनी पिशवीतून एक पाटी काढली व त्यावर खडूने ‘येथे कडीपत्ता फुकट दिला जातो’ असे लिहिले व ती पाटी दर्शनी भागात लावली. ‘ही पाटी येथून काढायची नाही. पन्नास रुपयांची ही पाटी मी तुम्हाला मोफत दिलीय.’ असे म्हणून प्रसन्न मुद्रेने जांबुवंतराव घरी निघाले.