
महाविकास आघाडीचा पोपट मेलाय ः देवेंद्र फडणवीस
पुणे, ता. १५ : ‘‘कोणी कुठे बसायचे?, कोणी बोलायचे?, यावरून वज्रमुठ सभेला यापूर्वीच तडे गेलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे कळून चुकले आहे की, महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे; फक्त ते त्यांच्या कार्यकर्त्यांना संदेश देण्यासाठी काही तरी बोलत आहेत,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांचे बालेवाडी येथे उद्घाटन व भूमिपूजन झाल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, असे फडणवीस भाजपच्या कार्यक्रमात बोलले होते. त्यावर ते म्हणाले, ‘‘महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जुलै महिन्यामध्ये सुनावणी होऊन ऑगस्टमध्ये निकाल येऊ शकतो. त्यामुळे साधारणपणे ऑक्टोबरमध्ये निवडणूक होतील, असा अंदाज मी व्यक्त केलेला आहे. यापेक्षा वेगळे काही नाही.’’
अजित पवार यांनी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत केलेल्या दाव्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, ‘‘लोकसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या वेळीच होतील, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. लोकसभेच्या निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचंड मतांनी निवडून येऊ. त्यानंतर अधिक काम करून विधानसभेमध्येही जिंकू.’’
वज्रमुठीला आधीच तडे गेलेले आहेत. कोणी कुठे बसायचे?, कुठे उभे राहायचे?, कोणी बोलायचे? यावरून वाद आहेत. त्यांच्या नेत्यांबद्दल शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेले आहे. त्यामुळे आम्ही विरोधक आहोत, त्याबद्दल बोलण्याची गरज नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
तो निर्णय विधानसभाध्यक्षांचा
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत मी काहीच बोलू शकत नाही. हे संपूर्ण प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे त्याची सुनावणी होणार आहे. जो काही निर्णय द्यायचा आहे, तो निर्णय विधानसभाध्यक्षच देतील. मात्र, एक अभ्यासक म्हणून, एक वकील म्हणून आणि २५ वर्षे विधानसभेत काम केले म्हणून मला असे वाटते की, महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. पण कार्यकर्त्यांना काही तरी संदेश देण्यासाठी पोपट जिवंत असल्याचे दाखविले जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
जिल्हा विभागणीच्या अनेक मागण्या
बारामती लोकसभा मतदारसंघावर पत्रकारांचे जास्त लक्ष आहे. आम्ही सर्व ४८ लोकसभा मतदारसंघावर लक्ष देत आहोत. तेथे केंद्रीय नेत्यांचे सातत्याने दौरे होत आहेत. बारामती त्यापेक्षा काही वेगळे नाही. जिल्हा विभागणीच्या अनेक मागण्या आमच्यापुढे आहेत. त्यामुळे एखाद्या जिल्ह्याचा विचार करता येणार नाही. सर्वच जिल्ह्यांचा विचार करावा लागेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.