
राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता
पुणे, ता. १६ : राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार कायम असतानाच पुढील २४ तासानंतर तापमानात दोन ते तीन अंशांनी पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा ताप असाच कायम राहणार आहे.
मंगळवारी (ता. १६) राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद गोंदिया येथे ४२.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंशाच्या दरम्यान कायम आहे. सध्या उत्तर बिहारपासून मध्य छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तर बुधवारी (ता. १७) राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होण्याबरोबरच उन्हाचा ताप आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.
शहर आणि परिसरात तापमानात घट आणि वाढ होत असून जिल्ह्यात कमाल तापमान ३३ ते ३८ अंशाच्या दरम्यान आहे. मंगळवारी शहरात ३६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील चार ते पाच दिवस शहरातील तापमानात अशीच स्थिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उन्हाचा ताप पुणेकरांना असाच सहन करावा लागणार आहे.
असा आहे अंदाज :
- कमाल तापमानातील वाढ आणि आर्द्रता, गरम हवेमुळे मुंबई तसेच कोकणात उष्णतेच्या झळा शनिवारपर्यंत (ता. २०) कायम राहण्याची शक्यता
- नंदुरबार, धुळे, जळगांव व विदर्भातील जिल्ह्यात पुढील दोन ते तीन उन्हाच्या झळांसह धुळीच्या लाटेची शक्यता