धर्म-देशासाठी शिवरायांचा आदर्श ठेवा

धर्म-देशासाठी शिवरायांचा आदर्श ठेवा

पुणे, ता. १८ : सनातन धर्म हा सगळ्यात प्राचीन धर्म आहे. यामध्ये नित्य नूतन भर पडते आहे. आपला धर्म आणि देश गौरवान्वित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आपल्यासमोर पाहिजे. महाराजांसमोर नतमस्तक होऊन, त्यांची मूर्ती घेऊन आपले कार्य सुरू ठेवले पाहिजे, तरच देश आणि धर्म टिकेल, असे मत मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
आम्ही पुणेकर संस्थेतर्फे आयोजित पुण्याई पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी काश्मीर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १० फूट पुतळ्याचे पूजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांची पालखी काढण्यात आली. तसेच वीरपत्नींच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, मार्गदर्शक पंडित वसंतराव गाडगीळ, विश्वस्त अभयराज शिरोळे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, ऑस्कर ज्युरी उज्ज्वल निरगुडकर, दुर्गसंवर्धक श्रमिक गोजमंगुडे, वैशाली व रूपाली हॉटेलचे प्रमुख विश्वजीत जाधव, पुरातत्त्व विभाग सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाने आदींना पुण्याई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बलकवडे म्हणाले, ‘‘काश्मीरमध्ये जवानांना प्रेरणा देण्यासाठी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुण्यातील लोकांनी यासाठी पुढाकार घेतला ही पुणेकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. २० व्या शतकात कोणत्याही लोकशाही राष्ट्राला अभिमान वाटावा, असे राष्ट्र शिवाजी महाराजांनी निर्माण केले.’’

काश्मीरमध्ये उभारणार पुतळा
शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज आठवावीत, महाराजांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभा करण्यात येणार आहे. काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे प्रमुख अभयराज शिरोळे व आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com