व्यावसायिकास पाच कोटींची खंडणीची मागणी

पाटस टोल नाक्यावर थरार, पोलिसांकडून गोळीबार

व्यावसायिकास पाच कोटींची खंडणीची मागणी पाटस टोल नाक्यावर थरार, पोलिसांकडून गोळीबार

पुणे, ता. १८ : खराडीमधील इऑन आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर व्यावसायिकाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्यांना पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न खंडणीबहाद्दरांनी केला. पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीनंतर प्रसंगावधान राखत गुन्हे शाखेतील पोलिसांनी खंडणीबहाद्दरांवर गोळीबार केला. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाटस टोल नाक्याजवळ घडली.

महेश सौदागर हनमे (रा. सोलापूर) आणि त्याचा साथीदार दिनेश हनमे यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऑगस्ट २०२२ पासून खराडी येथील इऑन आयटी पार्कमधील ३४ वर्षीय सॉफ्टवेअर व्यावसायिक यांच्याकडे खंडणी मागत होते. त्यांनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. आजपर्यंत त्यांनी तीन लाख ८० हजार रुपये घेतले आहेत. महेश सौदागर हनमे हा स्वतः पत्रकार असल्याचे सांगत होता. त्याने फिर्यादीची बदनामी करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या खोट्या बातम्या तयार करून व्हॉट्सअ‍ॅपवर विविध लोकांना पाठवून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

महेश हनमे याने व्यावसायिकास ५० लाख रुपये पाहिजे, अशी धमकी दिली होती. त्यासाठी त्याने मोहोळ (जि. सोलापूर) येथे बोलावले. व्यावसायिकाने याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली. गुन्हे शाखेचे पोलिस गुरुवारी सकाळी मोहोळकडे रवाना झाले होते. पोलिस आपल्या मागावर असल्याचे आरोपींना समजले. पाटस टोल नाक्याजवळ पोलिस गेले. तेथे आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत आरोपींवर गोळीबार केला. मोटारीच्या पाठीमागील टायरवर गोळ्या लागल्या आहेत. पोलिसांनी पाठलाग करून महेश सौदागर हनमे आणि दिनेश हनमे यांना ताब्यात घेतले आहे. महेश हनमे याच्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com