लहुजी वस्ताद यांचे विचार आत्मसात करा शरद पवार : ‘डेमोक्रॅटिक पार्टी’च्या महाधिवेशनाचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लहुजी वस्ताद यांचे विचार आत्मसात करा 
शरद पवार : ‘डेमोक्रॅटिक पार्टी’च्या महाधिवेशनाचे उद्‍घाटन
लहुजी वस्ताद यांचे विचार आत्मसात करा शरद पवार : ‘डेमोक्रॅटिक पार्टी’च्या महाधिवेशनाचे उद्‍घाटन

लहुजी वस्ताद यांचे विचार आत्मसात करा शरद पवार : ‘डेमोक्रॅटिक पार्टी’च्या महाधिवेशनाचे उद्‍घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : ‘‘क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. आजच्या काळात तरुणांनी त्यांचे विचार आणि कार्य आत्मसात केले पाहिजे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १९) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केले.

डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या राज्यव्यापी महाअधिवेशनाचे उद्‍घाटन शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी डेमोक्रॅटिक पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. सुकुमार कांबळे, प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अनिल हतागळे, सोहम लोंढे, नंदकुमार नांगरे, संदीप ठोंबरे, अशोक वायदंडे, सुभाष लोणके, रमेश चांदणे आदी उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, ‘‘उपेक्षित मातंग समाजाने आता एकसंध राहण्याची गरज आहे. कारण सध्या काही जण महापुरुषांची नावे घेऊन आताच्या तरुणपिढीला वेगळा आणि चुकीचा रस्ता दाखवीत आहेत. अशावेळी समाजाने एकसंध राहून समाजाचा विकास आणि अन्यायाबाबत लढले पाहिजे. त्यासाठी मी सदैव आपल्यासोबत राहील.’’

पवार यांनी आपल्या भाषणात माणगाव परिषद, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक संदर्भ दिले. या वेळी शरद पवार यांचा घोंगडी, पगडी व लहुजी वस्ताद साळवे यांचा दांडपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. अजिंक्य चांदणे यांनी प्रास्ताविक केले.

‘मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे’
राज्यातील मातंग समाजाला अ, ब, क आणि ड या वर्गवारीप्रमाणे स्वतंत्र आरक्षण मिळावे. लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक करण्यात यावे आणि मातंग समाजाच्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यात यावेत आदी मागण्या लक्ष्मण माने यांनी या वेळी बोलताना केल्या.