
राज्यसेवा २०२१ चा निकाल जाहीर
पुणे, ता. २४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या ‘राज्यसेवा परीक्षा २०२१’ चा निकाल जाहीर झाला असून, आयोगातर्फे विविध पदांची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापूर्वी राज्यात प्रथम क्रमांकाने यश मिळवलेल्या प्रमोद चौगुले यांनी पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावत पोलिस उपअधीक्षक पद प्राप्त केले आहे.
आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२१ परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी करत होते. अखेर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे. यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी निकालावर वर्चस्व कायम ठेवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षेची प्राथमिक यादी प्रसिद्ध झाली असून उत्तीर्ण उमेदवारांना ‘ऑप्टिंग आऊट’ चा पर्याय दिला जाणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीही केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम यादी केली जाणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.