दोन हजारांच्या नोटा; वादाला नाही तोटा

दोन हजारांच्या नोटा; वादाला नाही तोटा

संध्याकाळी कामावरून आल्यानंतर घरातील वातावरण थंड पाहून, शैलेश काळजीत पडला. ‘‘सोनालीताई, मुलांना घेऊन, आठ-दहा दिवस इकडे माहेरी राहायला येणार आहे का,’’ शैलेशने विचारले. त्यावर फक्त कपबशी फुटल्याचा आवाज आला. ‘‘शेजारणीने नवीन साडी वा दागिने खरेदी केलेत का,’’ शैलेशने विचारले. त्यावर भांड्यांच्या आदळआपटीचा आवाज आला. ‘‘अगं तुला झालंय तरी काय, आल्यापासून चेहरा पाडून कशाला बसली आहेस’’ शैलेश चिडून म्हणाला. ‘‘माझ्या मेलीची तुम्ही कधी हौसमौजच केली नाही. मला काय हवंय, काय नकोय, याची कधी काळजी केली का’’ कोमलने रागाने म्हटले. ‘‘अगं तुला काय हवंय, ते तरी सांग. असं कोड्यात बोलू नकोस.’’ शैलेशने म्हटले. ‘‘नोटबंदी २०१६ मध्ये झाल्यानंतर दोन हजारांच्या नोटा तुम्ही कधी घरी आणल्या का, जेव्हा तेव्हा खिशात बघावं, तर शंभरच्या नाहीतर पाचशेच्या नोटा असायच्या.’’ डोळ्यांत पाणी आणून कोमलने म्हटले. ‘‘अगं दोन हजारांच्या नोटांचं मध्येच काय, उलट त्या आणल्या नाहीत, हे बरंच झालं. त्या नोटांना आता कोणी विचारत नाही. बॅंकेत भरायची कटकट तरी वाचली.’’ शैलेशने म्हटले. ‘‘तुम्हाला तर व्यवहारज्ञान कधी येणार आहे, कोणास ठाऊक, आज आमची महिलामंडळाची भिशी झाली. त्या वेळी प्रत्येक बाई आपल्याकडे दोन हजारांच्या किती नोटा आहेत, असं फुशारकीनं सांगत होती आणि मी मात्र तोंड पाडून एका कोपऱ्यात बसले होते. बाकीच्या बायकाही एखाद्या भिकाऱ्याकडे बघावं, तशा माझ्याकडे बघत होत्या. माझ्याकडं एकही दोन हजारांची नोट नाही, हे पाहून मला फारच अपमानास्पद वाटलं.’’ कोमलने डोळे पुसत सांगितले. त्यानंतर तिने कपाटातील साड्यांमधून, पोटमाळ्यावरून, फळीवरील कळशीतून आणि देवघराच्या कप्प्यातून चुरगळलेल्या पन्नास, शंभर, दोनशे आणि पाचशेच्या नोटा बाहेर काढल्या. एकावर एक ठेवून तिने त्या मोजल्या. वीस हजार रुपये भरले. ‘‘हे सगळे पैसे घ्या आणि उद्या सकाळी साडेदहापर्यंत कसंही करून दोन हजारांच्या दहा नोटा मला आणून द्या.’’ कोमलने म्हटले. ‘‘तुला काय वेड लागलंय का, सारा देश दोन हजारांच्या नोटा बॅंकेतून बदलून आणतोय आणि तू मला उलटं करायला सांगतेस.’’ शैलेशने रागाने म्हटले. ‘‘उद्या सकाळी अकरा वाजता मंडळातील बायका दोन हजारांच्या नोटा बदलून आणण्यासाठी बॅंकेत जाणार आहेत. मीदेखील त्यांच्यासोबत जाणार आहे. माझ्याकडं बदलण्यासाठी दोन हजारांच्या नोटा नसतील तर ते मला किती कमीपणाचं आहे. सगळ्या बायका मला हसतील ना. त्यामुळं महिलामंडळात माझी इज्जत राहण्यासाठी तुम्ही मला दोन हजारांच्या दहा नोटा आणून द्या.’’ कोमलचं बोलणं ऐकून शैलेशला काय बोलावं, हेच कळेनासं झालं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com