
भारतीय सैन्यदलाच्या वतीने ‘टीईएस’साठी अर्जप्रक्रिया सुरू
पुणे, ता. १ : भारतीय सैन्यदलाच्या वतीने तांत्रिक प्रवेश प्रक्रियेंतर्गत (टीईएस) ५० व्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रवेशप्रक्रिया बारावी उत्तीर्ण पुरुष उमेदवारांसाठी आहे.
या अंतर्गत बारावीत विज्ञान शाखेच्या उमेदवारांना अर्ज करता येईल. यासाठी विज्ञान शाखेत गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या तिन्ही विषयांचे एकत्रित ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जेईई मेन २०२३ ची परीक्षा दिलेल्या उमेदवारांनाच अर्ज भरता येणार आहे.
या प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा नसून थेट ‘सर्व्हिस सिलेक्शन बोर्डा’च्या मुलाखती (एसएसबी) होणार आहेत. तर एसएसबी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढे ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी, गया येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल. टीईएस अंतर्गत पाचवर्षांचा प्रशिक्षणाचा कालावधी आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना अधिकारी म्हणून सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात दाखल केले जाईल, यासाठी वयोमर्यादा साडेसोळा ते साडेएकोणीस अशी ठेवण्यात आली आहे. एकूण ९० जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया होणार आहे.
या प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी किंवा अर्ज भरण्याकरिता सैन्य दलाच्या www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत ठेवण्यात आली आहे.