शेतकरी पत्नीला भरपाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी पत्नीला भरपाई
शेतकरी पत्नीला भरपाई

शेतकरी पत्नीला भरपाई

sakal_logo
By

दिवंगत शेतकऱ्याच्या पत्नीला
ग्राहक आयोगाकडून न्याय

व्याजासह भरपाई देण्याचा आदेश

पुणे, ता. ५ : अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचा दावा नाकारलेल्या विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. दावा दाखल केल्यापासून शेतकरी अपघात नुकसान भरपाईचे दोन लाख रुपये सात टक्के वार्षिक व्याजाने द्यावेत असा आदेश आयोगाने विमा कंपनीला दिला.
नुकसान भरपाईचे २५ हजार तसेच तक्रारीच्या खर्चाचे पाच हजार रुपये द्यावेत असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील महिलेने नॅशनल इन्शुरन्स कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांचे पती २४ एप्रिल २०१६ रोजी दुचाकीवरून करमाळा बायपासवरून जात होते. त्यावेळी त्यांना एका भरधाव ट्रकने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना अकलूज येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र १९ जून २०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेने आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे विम्याचा दावा दाखल केला. मात्र विमा कंपनीने मुदतीत विमा दाखल करण्यात आला नसल्याचे कारण देत दावा नाकारला. त्यामुळे महिलेने अ‍ॅड. टी. एस. थेटे यांच्यामार्फत ग्राहक आयोगात धाव घेतली.
याबाबत विमा कंपनीकडून लेखी कारण देण्यात आले. तक्रारदारांनी विमा कालावधीपासून ९० दिवसांच्या आत दावा दाखल करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी अतिरिक्त मुदतीनंतर दावा दाखल केल्याने तो नाकारल्याचे कंपनीने नमूद केले.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत, सर्व कागदपत्रे, शपथपत्र, लेखी युक्तिवाद ऐकून घेत आयोगाने हा आदेश दिला.
-----