बालनाट्य स्पर्धा बालरंगभूमी परिषद घेणार अन्य संस्थेकडे जबाबदारी दिल्याने रंगकर्मीमध्ये नाराजी
पुणे, ता. २४ : राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी बालरंगभूमी परिषद, मुंबई या संस्थेकडे देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारतर्फे राज्य नाट्य स्पर्धेचे सुरळीतपणे आयोजन होत असताना आणि स्पर्धेच्या संयोजनासाठी सरकारकडे सक्षम यंत्रणा असताना बालनाट्य स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी बाहेरील संस्थेला देण्यात येत असल्याने रंगकर्मींनी नाराजी व्यक्त केली आहे.
हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेसह बालकलाकारांसाठी बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रत्येक केंद्रावर समन्वयकाची नेमणूक केली जाते. या समन्वयकांवर सरकारच्या सर्व राज्य नाट्य स्पर्धांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी असते. मात्र, यावेळी राज्य सरकारने बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या स्थानिक समन्वयासाठी बालरंगभूमी शाखा समन्वयक म्हणून काम करेल, असा निर्णय एका पत्रातून जाहीर केला आहे.
बालरंगभूमी परिषदेने केलेल्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात येत असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. समन्वयासह बालरंगभूमी परिषदेमार्फत शिफारस करण्यात आलेल्या परीक्षकांचा नियुक्तीसाठी प्राधान्याने विचार केला जाणार असल्याचेही यात म्हटले आहे. यासह स्थानिक बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांना बालनाट्य स्पर्धेला आमंत्रित करणे, तसेच बालनाट्य शिबिराचे संयोजन बालरंगभूमी परिषदेमार्फत करण्याचा निर्णयही या पत्रात नमूद करण्यात आला आहे.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची सक्षम यंत्रणा असताना स्पर्धेचे आयोजन अशा अन्य संस्थेकडे देण्याबाबत रंगकर्मींनी आक्षेप नोंदवला आहे. राज्यात अनेक नाट्य संस्था कार्यरत असून, त्यांच्याकडे स्पर्धेच्या संयोजनाचा सशक्त अनुभव आहे. सरकार आपल्या स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी अन्य संस्थेला देणार असेल तर सर्व पात्र संस्थांना समान संधी दिली जावी आणि शिबिर आयोजन, परीक्षक नियुक्ती व समन्वयासाठी स्वतंत्र समिती आवश्यक असल्याची मागणी रंगकर्मींनी केली.
बालरंगभूमी परिषद, मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के-सामंत या आहेत. असे असताना सरकारच्या एका स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी या संस्थेकडे अचानकपणे दिली जाणे अयोग्य असल्याचे मत अनेक रंगकर्मींनी नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केले.
-----
‘‘यंत्रणेत त्रुटी आढळल्यास ती व्यवस्था बदलणे समजू शकतो. मात्र बालनाट्य स्पर्धेचे आयोजन सुरळीतपणे होत असताना त्याच्या संयोजनाची जबाबदारी बदलण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. सरकारतर्फे संयोजन होत असताना स्पर्धा पारदर्शकपणे होईल, असा विश्वास असतो. मात्र खासगी संस्थेला संयोजनाची जबाबदारी दिल्यावर स्पर्धेच्या पारदर्शकतेबद्दल निश्चितच शंका उपस्थित होते.
- अनमोल देशपांडे, बालनाट्य स्पर्धेतील नियमित स्पर्धक व नाट्य प्रशिक्षक
‘‘मुळात सरकारची स्पर्धा, ही सरकारचीच असायला हवी. यात कुठल्याही नाट्यसंस्थेचा हस्तक्षेप नसावा. आम्ही बालरंगभूमी परिषदेच्या काही संचालकांशी बोलल्यानंतर त्यांनी पुढील आठवड्यात या संदर्भात भेटून सविस्तर चर्चा आणि खुलासा करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
: बाबा पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

