‘रूबी’तील अवयव प्रत्यारोपण थांबणार? रुग्णालयाचे प्रशासन विचाराधीन; मूत्रपिंडप्रकरणी कायदेशीर लढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रूबी’तील अवयव प्रत्यारोपण थांबणार?
रुग्णालयाचे प्रशासन विचाराधीन; मूत्रपिंडप्रकरणी कायदेशीर लढा
‘रूबी’तील अवयव प्रत्यारोपण थांबणार? रुग्णालयाचे प्रशासन विचाराधीन; मूत्रपिंडप्रकरणी कायदेशीर लढा

‘रूबी’तील अवयव प्रत्यारोपण थांबणार? रुग्णालयाचे प्रशासन विचाराधीन; मूत्रपिंडप्रकरणी कायदेशीर लढा

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : सर्व प्रकारच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया थांबविण्याचा विचार आता रूबी हॉल क्लिनिक करत आहे. मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण प्रकरणात रुग्णालयाचे नाव पुढे आल्याने प्रशासन या निर्णयापर्यंत आल्याची माहिती पुढे आली आहे.

बनावट कागदपत्रे तयार करून मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी महिलेला पंधरा लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात आले. हा प्रकार अभिजित गटणे आणि रवींद्र रोडगे या मध्यस्थांच्या मदतीने करण्यात आला. ‘रूबी’मध्ये ही शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालय हा विचार करत असल्याची माहिती मिळाली.

याबाबत रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बोमी भोट म्हणाले, “मूत्रपिंड निकामी झालेल्या हजारो रुग्णांना ‘रूबी’ने जीवनदान दिले आहे. हे रुग्ण आता नियमित आयुष्य जगत आहेत. पण, रुग्णालयाची विनाकारण बदनामी सुरू आहे. रुग्णाच्या आजाराचे योग्य निदान, त्यावर अचूक शस्त्रक्रिया करणे ही रुग्णालयाचे बलस्थान आहे. पण मूत्रपिंड प्रकरणात रुग्णालयाचे नाव गोवण्यात आले आहे. याप्रकरणी रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना अटक होऊ नये, यासाठी कायदेशीर लढाई लढवी लागत आहे. या सगळ्याचे कारण म्हणजे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. त्यामुळे या शस्त्रक्रिया बंद केल्यानंतर नियमित रुग्णसेवेवर लक्ष केंद्रित करता येईल, या दृष्टीने विचार सुरू आहे.’’
या प्रकरणात रूबी हॉल क्लिनिकची चूक काय? प्रत्यारोपण करून जीवदान देणारे डॉक्टर गुन्हेगार कसे असू शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सध्या अवयव प्रत्यारोपण कायद्यातील पळवाटा काढून रुग्णालयांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे मोडतोड झालेले कायदे पुन्हा व्यवस्थित होतील, त्यावेळी अवयव प्रत्यारोपण सुरू करण्याचा विचार केला जाईल.
-डॉ. बोमी भोट, मुख्य कार्यकारी अधिकारी, रूबी हॉल क्लिनिक