कंबर कसली, सत्ता स्थापनेचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंबर कसली, सत्ता स्थापनेचा दावा
कंबर कसली, सत्ता स्थापनेचा दावा

कंबर कसली, सत्ता स्थापनेचा दावा

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः महापालिकेच्या निवडणुकीतील महिला आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्याने प्रभाग रचनेतील संभ्रम आणि उत्सुकता संपली आहे. आता इच्छुक उमेदवाराच्या तयारीला वेग येणार आहे. तर प्रत्येक राजकीय पक्षाकडून पक्ष संघटना मजबूत करणे, निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्याच्या कामाला गती येणार आहे. महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरातील प्रमुख पक्षांनी आमचा विजय निश्‍चीत आहे, सत्ता स्थापनेसाठी आम्ही तयार आहोत असा दावा केला आहे. तर शिवसेनेने मात्र आम्ही किंग मेकरच्या भूमिकेत असू असा दावा केला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. प्रारूप प्रभाग रचना करताना झालेला राजकीय हस्तक्षेप आणि त्यामुळे प्रस्थापित नगरसेवकांचे प्रभाग शाबूत राहिल्याची चर्चा मोठ्याप्रमाणात झाली. यामध्ये नैसर्गिक हद्दीचे पालन झाला नसल्याचेही आरोप झाले होते. या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सुनावणीनंतर एस. चोकलिंगम यांच्या समितीने मोठ्या प्रमाणात बदल सुचविले होते. अंतिम प्रभाग रचनेत ३२ प्रभागात बदल झाले, पण त्यापैकी १५ ते १६ प्रभागात मोठा बदल होता. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली तरी महिला आरक्षण निश्‍चीत न झाल्याने अनेक उमेदवारांचे तळ्यात मळ्यात धोरण होते. पण मंगळवारी महिला आरक्षण निश्‍चीत झाल्याने कोण कोणत्या प्रभागातून लढणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी देखील कंबर कसली आहे.

कोण काय म्हणाले?
जगदीश मुळीक, शहराध्यक्ष भाजप ः गेल्या पाच वर्षांत भाजपने उत्तम पद्धतीने महापालिकेत काम केले आहे. कोरोना काळात मदत केली, त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची संधी मिळणार आहे. ओबीसी आरक्षण नसले तरी आम्ही या समाजातील उमेदवारांना योग्य प्रमाणात संधी देणार आहोत.

प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ः सत्तेत असताना भाजपने केलेल्या गैरव्यवहार आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून पर्दाफाश केला आहे. त्यामुळे भाजपला सत्ता मिळणार नाही. महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर यात आम्ही आणखी ताकदवान झाले आहोत. येत्या निवडणुकीनंतर महापौर हा राष्ट्रवादीचाच होईल.

रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस ः प्रभाग रचना उत्तम पद्धतीने झाली आहे, त्यातच आता काही प्रभागात दोन महिला असणार आहेत. त्यामुळे आम्हाला सर्वसाधारण महिलांसह ओबीसीमधील महिलांना संधी देता येणार आहे. आज आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्याने पूर्ण १७३ जागांवर आम्ही निवडणूक लढविण्याची तयारी करणार आहोत.

गजानन थरकुडे, शहरप्रमुख, शिवसेना ः प्रभाग रचनेनुसार सर्वच प्रभागात शिवसेनेकडे सक्षम उमेदवार रिंगणात असतील. त्यामध्ये महिलांना मोठ्याप्रमाणात संधी मिळेल. आम्ही आघाडी धर्माचे कायम पालन करत आलो आहेत. शिवसेना सर्वच जागांची तयारी करत आहे, आम्हाला गृहीत धरले जाऊ नये. या निवडणुकीनंतर आम्ही महापालिकेत किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहोत.

साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, मनसे ः कोथरूड, शिवाजीनगर, कसबा, हडपसर या भागात मनसेकडे चांगले उमेदवार आहेत.कोरोना काळात केलेली मदत आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेल्यावेळी पेक्षा आमची नगरसेवक संख्या जास्त असेल.

विजय कुंभार, शहर कार्याध्यक्ष, आप ः महापालिका निवडणुकीसाठी आमची चांगल्या पद्धतीने तयारी सुरू आहे. आत्तापर्यंत आमच्याकडे ५०० अर्ज आले आहेत, त्यापैकी २२४ इच्छुक उमेदवार हे चांगल्या पद्धतीने तयारी असलेले आहेत. इतर पक्षातील चांगले उमेदवार आपमध्ये येऊ शकतात.’’

शैलेंद्र चव्हाण, शहराध्यक्ष, आरपीआय ः प्रभाग रचनेत योग्य प्रभागात अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षण पडले आहे, त्यामुळे आमचे १२ त १४ उमेदवार आरामात निवडून येऊ शकता. आगामी निवडणूक भाजपसोबत लढणार असून, त्यांच्याकडे २०
जागांची मागणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c03077 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top