
विद्यार्थ्यांनो, ‘ऑफलाइन’ परीक्षेचा स्वीकार करा !
पुणे - ‘विद्यार्थ्यांनी (Students) स्वत:च्या हिताचा, भविष्यातील उपलब्ध संधींचा विचार करता ऑफलाइन परीक्षांना (Offline exam) सहकार्य करायला हवे. विद्यापीठाने (University) दुसरे सत्र वाढवून दिले असल्याने अभ्यासाला पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षा देणे, हे भविष्यात नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता ऑफलाइन परीक्षेची तयारी करावी,’ असा सल्ला महाविद्यालयीन प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ यांनी दिला आहे.
मागील आठवड्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी समाज माध्यमावर (सोशल मीडिया) ‘विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात,’ अशी मागणी लावून धरली. दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी सोमवारी ऑनलाइन संवाद साधला. त्यावेळी सर्व विद्यापीठांतील परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, असे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञांनी सत्र परीक्षा ऑफलाइन होणेच विद्यार्थ्यांच्या हिताचे असल्याच्या मताला दुजोरा दिला.
शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी भविष्यात उपलब्ध संधींचा विचार करता ऑफलाइन परीक्षेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. विद्यापीठाने दुसरे सत्र पुरेसे वाढवून दिल्याने परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात नोकरीच्या दृष्टीने ऑफलाइन परीक्षाच योग्य ठरणार आहेत.’’
विद्यार्थी म्हणतात.....
जितेंद्र गवळी (नाशिक) : मी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रात आहे. दरवर्षी दोन सत्र होतात. परंतु विद्यापीठाने निर्णय उशिराने घेतल्यामुळे हिवाळी सत्र परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आली. आता उन्हाळी सत्रातील जवळपास ७० टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवून झाला आहे, तर केवळ ३० टक्के अभ्यासक्रम प्रत्यक्ष कॉलेजमध्ये शिकविण्यात आला. त्यामळे उन्हाळी सत्रातील परीक्षा केवळ ऑनलाइन घ्याव्यात आणि त्यानंतर सर्व परीक्षा नियमितपणे ऑफलाइन घ्याव्यात.
किरण वीरकर (सोलापूर) : एका शैक्षणिक वर्षात दरवर्षी हिवाळी आणि उन्हाळी अशी दोन सत्रे होतात. परंतु विद्यापीठाने परीक्षांबाबतच्या निर्णयात दिरंगाई केल्याने पहिल्या सत्रातील परीक्षा उशिराने झाल्या आहेत. हिवाळी सत्रातील परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये झाल्या. आता उन्हाळी सत्रातील परीक्षा जूनमध्ये ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन आहे. परंतु हे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे.
७०५ - विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये
६,५०,००० - (अंदाजे) परीक्षा देणारे विद्यार्थी
२२४ - अभ्यासक्रमांची संख्या
५,००० - (जवळपास) प्रश्नपत्रिकांची संख्या
निकाल कधी लागणे अपेक्षित : परीक्षेनंतर ३० ते ४५ दिवसांत
पेपर तपासणी सुरू कधी होते : संबंधित विषयाचा पेपर झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून
पुढील शैक्षणिक सत्र कधी सुरू होणार : १ ऑगस्ट २०२२ पासून
परीक्षा ‘ऑफलाइन’च का?
सत्राची मुदत वाढविल्याने परीक्षेच्या तयारीसाठी मिळतोय पुरेसा वेळ
विद्यार्थ्यांच्या भविष्यातील संधीचा विचार करता ‘ऑफलाइन’चा पर्याय योग्य
कोरोनाचा लाट नसल्याने दरवर्षीप्रमाणे ‘ऑफलाइन’ परीक्षा शक्य
गेल्या दोन वर्षांपासून असलेला ‘ऑनलाइन’चा शिक्का पुसणे गरजेचे
परीक्षा घेताना ही काळजी घ्यावी
लांबलेले शैक्षणिक सत्र सुरळीत होण्यासाठी विद्यापीठाने पावले उचलावीत
परीक्षा सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला झालेले पेपर तपासणीची यंत्रणा उभी करावी
निकाल वेळेत लावण्याला प्राधान्य द्यावे
परीक्षा झाल्यानंतर पुढील सत्र वेळेत सुरू करावे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन परीक्षा पद्धती केवळ तात्पुरती सोय म्हणून स्वीकारली होती. मुळात ऑनलाइन परीक्षा पद्धतीत अनेक त्रुटी राहतात, हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे. पारंपारिक पद्धतीने ऑफलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस लागतो. विद्यापीठाने ऑफलाइन परीक्षा घेताना, त्यांच्या निकालात उशीर होऊ नये, म्हणून पेपर झाल्यानंतर लगेचच पेपर तपासणीची यंत्रणा सक्षम ठेवावी. खरंतर विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हिताचा विचार करून ऑफलाइन परीक्षेचा स्वीकार करायला हवा.
- नंदकुमार निकम, अध्यक्ष, प्राचार्य फोरम
विद्यार्थ्यांनो, तुम्हाला काय वाटते?
शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना ‘ऑफलाइन’ परीक्षेचा स्वीकार करा, असा सल्ला दिला आहे. याबाबत तुम्हाला काय वाटते याबाबतचे मत आपल्या नावासह editor.pune@esakal.con या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअप क्रमांकावर कळवा.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57134 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..