
जिल्ह्यातील ५३७ शाळांमध्ये शाळा सुधार कार्यक्रम
पुणे, ता. २७ ः जिल्ह्यातील ५३७ प्राथमिक शाळांसाठी खास शाळा सुधार कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत या शाळांना पायाभूत आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शिवाय या शाळांमधील गुणवत्तेचा दर्जा अधिक चांगला केला जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात ८५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. दरम्यान, या शाळांमधील सर्व शिक्षकांची पाठाचे सादरीकरण आणि प्रशिक्षण गरजा निश्चितीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने ऑनलाइन चाचणी घेतली जाणार आहे.
यानुसार या सर्व शाळांमधील शिक्षकांच्या पाठाचे सादरीकरण शाळा पातळीवर घेण्याची सूचना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. शोभा खंदारे यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड यांना केली आहे. दरम्यान, शाळेला उन्हाळ्याची सुटी लागण्यापूर्वी सर्व शिक्षकांच्या पाठांचे निरीक्षण करावे. हे निरीक्षण विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्तींनी करावे. यासाठी शिक्षकांचे ऑनलाइन प्रशिक्षण द्यावे, असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे.
दरम्यान, या शाळांमधील सर्व शिक्षकांसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ‘विनोबा’ हे शैक्षणिक मोबाईल ॲप विकसित केले आहे. हे ॲप ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध करून दिले आहे. या ५३७ शाळांमधील सर्व शिक्षकांनी हे ॲप डाऊनलोड करून घेण्याचा आदेश आयुष प्रसाद यांनी दिला आहे. या ॲपमध्ये प्रत्येक शिक्षकाने आपापल्या नावासह नोंदणी करावी आणि ही नोंदणी येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावी, असे बंधन या शिक्षकांवर घालण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57472 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..