
‘ऑफलाइन’साठी सज्ज व्हा, उठा चला!
पुणे, ता. २७ ः उन्हाळी सत्राची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यास बहुतेक सर्वच विद्यापीठांनी पसंती दर्शवली आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षांसाठी स्वतःची मानसिकता तयार करायला हवी. त्याचबरोबर अंतर्गत मूल्यमापन, लेखी परीक्षेचा सराव, अभ्यासाचे नियोजन आणि गटचर्चेवर भर दिल्यास विद्यार्थी सचोटीने परीक्षेत यश संपादन करू शकतात, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
उशिराने झालेल्या हिवाळी परीक्षा अन् अल्पावधीत उरकरणारे उन्हाळी सत्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. अशा वेळी ऑनलाइन परीक्षा घेऊन संपूर्ण प्रक्रियाच लवकर उरकण्याची मागणी विद्यार्थी करत आहे. याच पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत नेहमीच्या ऑफलाइन परीक्षेला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता ऑफलाइन परीक्षेसाठी मानसिकता तयार करण्याचे आवाहन प्राध्यापक करत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेचे डॉ. जयंत करजगीकर म्हणाले, ‘‘सीओईपीच्या परीक्षा आता ऑफलाइन पद्धतीने होत आहेत. विद्यार्थ्यांनी आता डोळ्यात तेल घालून गांभिर्याने अभ्यास करायला हवा.’’
विद्यार्थी म्हणतात...
- हिवाळी परीक्षा मार्चमध्ये संपल्या, जूनपर्यंत अभ्यासक्रमाबरोबरच प्रात्यक्षिके, प्रकल्प, कार्यानुभव पूर्ण करणे आव्हानात्मक
- राज्यासह जगभरातील उच्च शिक्षणासाठीच्या प्रवेश परीक्षा जूनपासून सुरू होतात. अशा वेळी प्रवेशांना अडचणी येणार
- ऑफलाइन परीक्षेमुळे अंतिम परीक्षेचा निकाल लांबल्यास, नोकरभरती आणि इतर प्रवेशासाठी अडचणी वाढणार
अशी आहे त्रिसूत्री
- ऑफलाइन परीक्षेची मानसिकता तयार करा
- अंतर्गत मूल्यमापनासह हातात असलेल्या गुणांवर विशेष लक्ष द्या
- गट चर्चा, लेखी सराव, प्राध्यापकांनी मार्गदर्शन करावे
अडीच महिन्यांपासून महाविद्यालये ऑफलाइन सुरू झाली असून, परीक्षेच्या दृष्टीनेही सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन परीक्षेत तासाला १५ मिनिटे वाढले आहेत. तसेच द्वितीय सत्राचा कालावधीही वाढवून मिळाला आहे. विद्यार्थ्यांचे अहित होऊ नये म्हणून सर्व काळजी घेतली आहे. भविष्यातील नोकरी, व्यवसायाच्या संधीसाठी विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षांना महत्त्व द्यावे.
- डॉ. राजेंद्र झुंझारराव, मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पुणे
ऑफलाइन परीक्षेचे विद्यार्थ्यांनी विनाकारण चिंता करू नये. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना दोन पेपरमध्ये काही दिवसांचा अवधी मिळणार आहे. त्याचा निश्चित फायदा घ्यायला हवा. महाविद्यालय स्तरावर प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल मार्गदर्शन करायला हवे.
- डॉ. के. सी. मोहिते, प्राचार्य, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर
एसटी सेवा आता पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे आता त्यांनी वर्गात नियमित बसायला हवे. वेळच्यावेळी वर्गातील अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. कधी ना कधी तरी ऑफलाइन परीक्षा द्यावीच लागणार आहे. येत्या परीक्षेसाठी १५ मिनिटे अधिकचा वेळ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षेला समोर जावे.
- डॉ. संजय चाकणे, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57544 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..