
पुण्यातील दांपत्याची युरोपात ‘नृत्यभरारी’
पुणे, ता. २८ ः सालसा, बचाटा, झुंबा यासारखे पाश्चात्य नृत्यप्रकार आपल्याकडे अलीकडच्या काळात रुळले आहेत. मात्र पंधरा वर्षांपूर्वी हे नृत्यप्रकार नवीन असताना एक तरुण व तरुणी त्याकडे आकर्षित झाले. शक्य त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत त्यांनी यात प्रावीण्य मिळवले आणि आता पाश्चात्य देशांमध्ये जाऊन या नृत्यांचा प्रसार व प्रचार आणि तेथील लोकांना या नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. या दांपत्याचे नाव आहे, भाविन शुक्ल आणि सूनृता कोठडिया.
पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हे दोघे सालसा, बचाटा आदी नृत्यप्रकारांकडे आकर्षित झाले. नियमितपणे प्रशिक्षण घेतल्यानंतर हळूहळू त्यांचा या क्षेत्रात जम बसला. स्वतः प्रशिक्षक म्हणून काम सुरू केल्यावर त्यांनी काही मित्रांसह हे नृत्य शिकवण्यासाठी कंपनीही सुरू केली. २०१६ मध्ये त्यांनी लग्नही केले. पुढे या दोघांची नृत्यातील साधना आणि सफाई बघून ‘लॅटिन डान्स फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होण्यासाठी तसेच कार्यशाळा घेण्यासाठी युरोपातील विविध देशांतून त्यांना निमंत्रणे येऊ लागली. त्याचे प्रमाण वाढल्यावर काही वर्षांपूर्वी त्यांनी युरोपातच जर्मनीतील कलोन या शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
या दांपत्यातील सूनृता हिचे शिक्षण ‘अक्षरनंदन’ या मराठी माध्यमातील शाळेत झाले आहे, तर भाविन पुण्याच्याच विखे पाटील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकला आहे. भाविनने त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले, तर सूनृताने समाजशास्त्रातून पदवी घेतली असून, पाच वर्षे ती प्रिया निमकर जोशी यांच्याकडे भरतनाट्यमही शिकली आहे. मनापासून आवडणाऱ्या या आगळ्यावेगळ्या पाश्चात्य नृत्याच्या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला दोघांच्याही कुटुंबांमध्ये या निर्णयाबाबत साशंकता होती. मात्र दोघांचा ठाम निर्णय पाहून पालकांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिली, असे भाविन आणि सूनृता आवर्जून सांगतात. यापुढील काळात युरोपातील अन्य देशांना भेटी देण्याचे आणि कलोन शहरामध्ये या वर्षी ‘इंटरनॅशनल लॅटिन डान्स फेस्टिव्हल’ घेण्याचे त्यांचा विचार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c58127 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..