नुसता होऊ द्या खर्च! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुसता होऊ द्या खर्च!
नुसता होऊ द्या खर्च!

नुसता होऊ द्या खर्च!

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः शहरातील महत्त्वाची व मध्यवर्ती भागात असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकामध्ये दरवर्षी लाखो रुपयांची तरतूद केलेली असते. पण एवढा निधी असून देखील वैकुंठाच्या परिसरात अस्वच्छता आहे. ठिकठिकाणी कचरा, कपडे, अंत्यविधीचे साहित्य पडलेले असतानाही हे उचलण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
शहरात वैकुंठ, हडपसर, धनकवडी, कात्रज, येरवडा, वडगाव, कैलास यासह इतर १० ते १२ ठिकाणी स्मशानभूमी आहेत. वर्षभरात महापालिकेकडून सुमारे साडे चार हजार मयत पास घेतले जातात. महापालिकेची वैकुंठ स्मशानभूमीही शहराच्या मध्यवर्ती भागात आहे, तसेच येथे डिझेल, गॅस, विद्युत दाहिनीसह पारंपारिक पद्धतीने लाकडावर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा आहे. त्यामुळे मध्यवर्ती पेठांसह कोथरूड, सिंहगड रस्ता, पर्वती व इतर भागातून नागरिक अंत्यविधीसाठी येतात. दिवसाला सुमारे १२ ते १५ अंत्यविधी वैकुंठ स्मशानभूमीत होतात.
वैकुंठ स्मशानभूमीत चार शेडपैकी तीनमध्ये प्रत्येकी ६ आणि एका शेडमध्ये सात असे एकूण २५ अंत्यसंस्कार करण्याची सुविधा आहे. तर विद्युत, गॅस व डिझेल वाहिनी आहे. येथील कामकाज आरोग्य विभागातील कर्मचारी पाहत होते, पण आता त्यांना काढून तेथे ठेकेदारीपद्धतीने काम करून घेतले जात आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी स्मशानभूमीतील रस्ते स्वच्छ करण्याचे काम करतात. तर शेडमधील स्वच्छता ठेकेदाराचे लोक करत आहेत.
स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनीच्या पाठीमागील भागाला मृतांच्या अंगावरील हार, फुले, तिरडी, पांघरून यासह इतर कपडे टाकण्यात आले आहेत. या भागात अनेक दिवसांपासून स्वच्छता केलेली नाही. तसेच अंत्यविधीच्या शेडच्या समोरच्या भागात असलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. तेथे स्मशानभूमीतील कचरा फेकण्यात आला आहे. हे काम करताना विद्युत विभाग कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाकडे बोट दाखवत आहे, तर क्षेत्रीय कार्यालयाकडून उद्यान विभागाकडे बोट दाखवले जात आहे.

अंदाजपत्रकात ७५ लाखांची तरतूद
गेल्यावर्षीच्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात वैकुंठ स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीसाठी ६० लाखांची तरतूद होती, तर स्थापत्य विषयक कामासाठी ३५ लाखाची तरतूद होती. त्याचप्रमाणे विविध स्मशानभूमींसाठी एकत्रित ५.३० कोटींची तरतूद होती. त्यातून येथे खर्च करण्यात आला आहे. तर २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात ७५ लाखांची तरतूद आहे. त्याचप्रमाणे विद्युत विभाग व आरोग्य विभागाकडेही तरतूद उपलब्ध आहे. वैकुंठ स्मशानभूमीसाठी लाखो रुपयांची तरतूद असताना त्याप्रमाणात तेथे स्वच्छता व सुविधा नसल्याचे पाहणीत समोर आले.

अशी आहे स्थिती
- स्मशानभूमीच्या परिसरात कचरा पडल आहे
- अंत्यविधीचे साहित्य विविध भागात विखुरले आहे
- उद्यानाच्या जागेत पक्षांच्या विष्ठेमुळे दुर्गंधी पसरली आहे
- उद्यानाकडे अनेक महिन्यांपासून लक्ष दिलेले नाही
- अंत्यविधीतून निर्माण झालेला कचरा साठविण्यात आला आहे
- रोज कचरा उचलला जात नाही

विद्युत विभागाकडून स्मशानभूमीतील यंत्रणा चालविण्यासाठी ठेकेदाराकडून कामगार नियुक्त केले आहेत, आम्ही शेडच्या आतील स्वच्छता करतो. परिसरातील स्वच्छता क्षेत्रीय कार्यालयांकडून होणे आवश्‍यक आहे.
- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c58775 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top