
पुण्यात अक्षय्य तृतीया चैतन्यमय वातावरणात
पुणे, ता. ३ : ‘‘अक्षय राहो सुख तुमचे, अक्षय राहो धन तुमचे, धन, लक्ष्मी येवो घरी, लक्ष्मीची कृपादृष्टी राहो त्यावरी’’, अशा एकमेकांना शुभेच्छा देत साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणारी अक्षय्य तृतीया नागरिकांनी मोठ्या चैतन्यमय वातावरणात साजरी केली.
शहरातील प्रमुख मंदिरांमध्येही दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. या दिवसाचा मुहूर्त साधत अनेकांनी गृहप्रवेशासारख्या शुभ कार्य केली.
केवळ सोने खरेदीच नव्हे, तर घर-गाडी खरेदी, गृहप्रवेश, लग्न, नवीन कार्याची सुरुवात यासारखी शुभकार्ये करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त शुभ मानला जातो. त्यामुळे अनेक नागरिकांनी शुभकार्याची सुरवात या दिवशी केली. तसेच घरोघरी या दिवशी पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी त्यांचे स्मरण करण्यात आले आणि पूर्वजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सकाळपासूनच घरोघरी पूजाअर्चा करण्याच्या तयारीची लगबग दिसून आली. खास नैवेद्य तयार करण्यासाठी महिला भल्या पहाटेपासूनच कामाला लागल्या होत्या. घरोघरी आंबे, आमरस, पुराण पोळी असा नैवेद्य देखील दाखविण्यात आला.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संपूर्ण दिवस शुभ असतो. त्यामुळे या दिवशी सोने, चांदी, वाहने, मौल्यवान वस्तू यांसह अन्य नव्या वस्तूंची खरेदी करणे नागरिकांनी पसंत केले. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यावर काहीशा मर्यादा आल्या होत्या. परंतु यंदा मात्र कोरोनाचे सावट काहीसे दूर झाल्यामुळे नागरिकांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला. घरातील पूजाअर्चा झाल्यानंतर या शुभदिवसाचे औचित्य साधून नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59662 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..