
पुण्यात चौपट पोलिस, तरीही उडते तारांबळ
पुणे - अभिनव चौकात (नळस्टॉप चौक) (Abhinav Chowk) पूर्वी दोन ते तीन पोलिस कर्मचाऱ्यांकडून (Police Employee) वाहतूक नियोजन (Traffic Management) केले जात होते. मात्र, तेथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एक पोलिस अधिकारी, आठ पोलिस कर्मचारी, तीन वॉर्डन असे तब्बल बारा जण सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर असतात, तरीही वाहतूक कोंडी फुटण्याची चिन्हे नाहीत. याउलट आता वाहतूक पोलिसांवरही वाहतुकीचा ताण वाढत असल्याची सद्यःस्थिती आहे.
कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौक येथील मेट्रो पुलालगत बांधलेल्या दुहेरी उड्डाणपुलामुळे डेक्कनहून पौड फाट्याकडे व पौड फाट्याहून डेक्कनच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला. दुसरीकडे, मात्र विधी महाविद्यालयाकडून कर्वेनगर, कोथरूड, पौड फाट्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांची दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे दमछाक होत आहे. तर म्हात्रे पुलाकडून येणारी वाहनेही उड्डाणपुलाजवळच्या निमुळत्या रस्त्याने जाताना आणि दुहेरी उड्डाणपुलावरून वाहने उतरताना पुढे एकत्र येऊन तिथे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
दुहेरी उड्डाणपूल होण्यापूर्वी नळस्टॉप चौकात दोन ते तीन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक नियमन केले जात होते. सध्या येथे एक पोलिस निरीक्षक, आठ पोलिस कर्मचारी, तीन ते चार वॉर्डन अशी बारा जणांची कुमक सध्या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काम करत आहे. त्यामध्ये लागू बंधू दुकानाजवळ तीन व एसबीआय बॅंकेजवळ प्रत्येकी तीन-तीन पोलिस कर्मचारी नेमावे लागत आहेत. तसेच नळस्टॉप, विधी महाविद्यालय रस्ता, पौड फाटा या ठिकाणी नियमन केले जात आहे. आवश्यक ठिकाणी बोलार्डसचा वापर करणे, चारचाकी वाहनांना अंतर्गत रस्त्यांऐवजी मुख्य रस्त्यांवरून जाण्यास सांगणे, पीएमपी बस उड्डाणपुलावरून जाण्यास लावणे अशा काही उपाययोजना वाहतूक पोलिसांच्या सूचनेवरून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेमके काय होते?
वाहतूक कोंडीची वेळ सायंकाळी ६ ते रात्री ८
दोन मिनिटांच्या एका सिग्नलवेळी थांबणाऱ्या वाहनांची संख्या अंदाजे १०० ते १५०
वाहतूक कोंडीमुळे लागणारा वेळ ३५ मिनिटे
अभिनव चौक ओलांडण्यासाठी इतरवेळी लागणारा वेळ १५ मिनिटे
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59714 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..