‘समाधीस्थळा’वरून वादंग कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘समाधीस्थळा’वरून वादंग कायम
‘समाधीस्थळा’वरून वादंग कायम

‘समाधीस्थळा’वरून वादंग कायम

sakal_logo
By

जातीय द्वेषातून लोकमान्यांवर आरोप ः बलकवडे, आंग्रे
पुणे, ता. ३ : ‘‘रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, असे म्हणण्याऐवजी त्यांच्या प्रयत्नांतून झाली, असे म्हणणे योग्य ठरेल. लोकमान्यांनी रायगडावरील शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी आयुष्यभर कार्य केले. परंतु जातीय द्वेषातून त्यांच्यावर आरोप करून त्यांचे श्रेय नाकारणे यासारखे दुर्दैव नाही,’’ असे मत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे आणि इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी बांधली, असे वक्तव्य केले होते. त्यावरून वादाला तोंड फुटले आहे. या संदर्भात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने मंगळवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.
टिळकांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांचा मंडळाने निषेध केला. त्यावर आपण राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करता का, या प्रश्नावर मंडळाने ते म्हणाले, ‘‘आम्हाला कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेचे नाव घ्यायचे नाही. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांशी बांधील नाही. कोण जातीयवादी आणि धर्मांध आहेत, त्यांचे विचार, पाप-पुण्य त्यांच्यासोबतच,’’ असे स्पष्ट केले.
बलकवडे म्हणाले, ‘‘जेम्स डग्लस या इंग्रजाने शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरवस्थेविषयी ‘बुक ऑफ बॉम्बे’ पुस्तकातून ब्रिटिश सरकारवर टीका केली. डग्लसचे हे वर्णन वाचून मराठी माणसाच्या मनात अस्वस्थता पसरली. लोकमान्यांनी मंडळाच्या माध्यमातून शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला.’’
लोकमान्यांचे वंशज कुणाल टिळक म्हणाले, ‘‘टिळकांनी समाधी बांधली, असे आम्ही म्हणत नाही. परंतु राजकीय वक्तव्ये करून कोणीही टिळकांच्या कार्याचा अवमान करावा, हे योग्य नाही. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम कोणी करू नये.’’ माजी अध्यक्ष जगदीश कदम यांनी मंडळाची भूमिका स्पष्ट केली.

निधी बँकेत जमा केला
लोकमान्य टिळकांच्या आवाहनातून शिवभक्तांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी दिलेला निधी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने डेक्कन बँकेमध्ये साठविला होता. परंतु डेक्कन बँक अवसायनात निघाली. त्यांनी डगमगून न जाता पुन्हा १२ हजार रुपयांचा निधी जमा केला. दरम्यान, लोकमान्यांच्या निधनानंतर पाच वर्षांनी ब्रिटिश सरकारने जीर्णोद्धाराची परवानगी दिली, असे या वेळी सांगण्यात आले.

पुरावे सादर करावेत
महात्मा फुले यांनी रायगडावरील छत्रपतींच्या समाधीचा शोध घेतला की नाही, हे मला माहीत नाही. कोणाकडे पुरावा असेल तर मी नाकारण्याचे काही कारण नाही. मराठेशाहीच्या काळात समाधीवर मेघडंबरी उभारण्याची पद्धत नव्हती. राजकीय लोकांचे धंदे असतात, ते आज हा झेंडा तर, उद्या दुसरा झेंडा घेऊन मिरवतात. स्वत:ला इतिहास संशोधक समजता, तर श्रीमंत कोकाटे यांनी पुरावे सादर करावेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59723 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top