
झोपण्याच्या वादातून भिक्षेकऱ्याचा खून
पुणे, ता. ३ ः पदपथावर झोपण्याच्या वादातून अनोळखी भिक्षेकऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्याचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास नाना पेठेत घडली. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.
मोहित अमीर अंगीर (वय ३०, रा. खडकी ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रिजवान शेख (वय ४१, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहीत हा उच्चशित आहे. त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला असून सध्या तो एकटाच राहतो. मागील काही दिवसांपासून तो नाना पेठेतील पदमजी चौक परिसरात येत होता. या ठिकाणी मागील काही महिन्यांपासून भिक्षेकऱ्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्यावेळी भिक्षेकरी पदपथावर झोपतात. दरम्यान, सोमवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मोहित पदमजी चौकातील पदपथावर पदपथावर झोपण्यासाठी आला होता. मात्र तेथे आगोदरच झोपलेल्या एका अनोळखी भिक्षेकऱ्याने त्यास तेथे झोपण्यास विरोध केला. तसेच त्यास शिवीगाळही केली. या प्रकारामुळे चिडलेल्या अंगीरने तेथेच पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून भिक्षेकऱ्याच्या डोक्यात घातला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने भिक्षेकऱ्याचा मृत्यु झाला. दरम्यान, हा प्रकार फिर्यादी रिजवान शेख यांनी पाहिला. त्यांनी याबाबत स्थानिक नागरीक व गस्तीवरील पोलिसांना माहिती दिली. मोहित पळून जाण्याच्या तयारीत असतानाच समर्थ पोलिसांनी त्यास अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59736 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..