
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सौम्य वाढ
पुणे, ता. ३ : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सौम्य वाढ दिसून आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे निरीक्षण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने नोंदले आहे. ही वाढ सर्वाधिक मुंबईमध्ये असून, त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात आहे.
राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटांचा उद्रेक झाला आहे. त्याचवेळी देशातील दिल्ली, राजस्थान अशा काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढीचा वेग सौम्य आहे, असे आरोग्य खात्याने स्पष्ट केले.
राज्यात जानेवारीपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा उद्रेक झाला. त्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मात्र, या व्हेरियंट श्वसनसंस्थेच्या वरच्या भागापुरताच मर्यादित राहिला. यापूर्वी पहिल्या लाटेत आलेल्या अल्फा आणि दुसऱ्या लाटेत थैमान घातलेल्या डेल्टा व्हेरियंटने रुग्णांच्या थेट फुफ्फुसावर हल्ला केला होता. त्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील ओमिक्रॉन व्हेरियंट सौम्य असल्याचे जाणवले. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागली नाही. त्यानंतर मार्चपासून रुग्णसंख्या सातत्याने कमी होऊ लागली. मात्र, १८ एप्रिलच्या आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या सौम्य प्रमाणात वाढत आहे. राज्यात ११ ते १७ एप्रिल या दरम्यान ३६७ असलेली रुग्णसंख्या १८ ते २४ एप्रिलच्या आठवड्यात ९३७ पर्यंत वाढल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सौम्य वाढ होत असल्याचे निरीक्षण खात्यातर्फे नोंदवण्यात आले.
कुठे वाढ झाली?
राज्यात सध्या सर्वाधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. तेथे ५८७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागलो. पुणे जिल्ह्यात २१६ सक्रिय रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात ९२ रुग्णांची नोंद झाली आहे. नगर (१६), रायगड (१५), नाशिक (१३) येथे रुग्णांची संख्या दोन अंकांमध्ये नोंदली आहे.
का वाढ झाली?
- कोरोनाची साथ आता एन्डामिक झाली आहे. याचा अर्थ, अशा प्रकारचे कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळत राहातील.
- सध्या आढळणाऱ्या रुग्णांना ओमिक्रॉन याच व्हेरियंटचा संसर्ग होत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नाही.
आरोग्य खात्याचे निरीक्षण...
१) राज्यात दररोज १५० ते १७५ च्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. ही फार मोठी नाही.
२) राज्यात कोरोना संसर्गाचा दर अद्यापही एक टक्क्यापेक्षा कमी आहे.
३) सर्व निर्बंध काढून पाच आठवडे
झाल्यानंतरही रुग्णसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही.
४) कोरोना संसर्ग झालेल्या ९५ टक्के रुग्णांना कोणतीही ठळक लक्षणे नाहीत.
काय काळजी घ्यावी?
१) नागरिकांनी कोरोना संसर्गाबाबत हलगर्जीपणा करू नये.
२) गर्दीच्या ठिकाणी, रुग्णालयात, दवाखान्यात जाताना मास्क वापरावा.
३) राज्यात मास्कची सक्ती केली नसली तरीही सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर करावा.
४) कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
५) वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुवावेत.
६) नाक, तोंडाला वारंवार हाताने स्पर्श करू नये.
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येकडे बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. त्यात अत्यंत सावधगिरीने जिल्हानिहाय परिस्थिती बघितली जात आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सौम्य वाढ असली तरीही त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे चित्र दिसत नाही.
- डॉ. प्रदीप आवटे,
साथरोग सर्वेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, महाराष्ट्र
राज्यात असे वाढले रुग्ण
आठवडा ..................... रुग्णसंख्या
११ ते १७ एप्रिल ........ ३६७
१८ ते २४ एप्रिल ........ ९३७
२५ एप्रिल ते १ मे ...... ९७६
(स्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग)
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण : ९८.११ टक्के
राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर : १.८७ टक्के
कोरोना संसर्गाचा दर : ९.८२ टक्के
आतापर्यंत तपासलेले प्रयोगशाळा नमुने : ८,०२,५०,५२८
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या : ७८,७८,१७५
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या : १,०२७
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59765 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..