
पुण्यात कमाल तापमानात घट
पुणे, ता. ३ ः पुणे शहर आणि परिसरात कमाल तापमानाचा पारा घसरणार असून पुढील आठवडाभर दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा ताप कमी झाला असून कमाल तापमानात हळू-हळू घट होत आहे. मंगळवारी शहरात ३७.८ अंश सेल्सिअस कमाल आणि २०.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर पुढील दोन दिवस शहरात सायंकाळी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या सोमवारपर्यंत (ता. ९) अंशतः ढगाळ वातावरणाची चिन्हे आहेत. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा हा कमी राहू शकतो.
उष्णतेच्या लाटेचा अंदाज
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण होत आहे. बुधवारी (ता. ४) राज्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला.
मंगळवारी विदर्भात काही भागात पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४४.५ अंश इतके नोंदले गेले. विदर्भात तापमानाचा पारा काहीसा खाली गेला आहे. तर अकोला, ब्रम्हपुरी, चंद्रपूर या ठिकाणी अद्याप पारा ४४ अंशांच्या पुढे आहे.
सध्या पूर्व विदर्भ, तेलंगण, रायलसीमा ते तमिळनाडूपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी वातावरण पोषक होत आहे. परिणामी बुधवारी (ता. ४) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच पुढील तीन दिवस म्हणजेच येत्या शुक्रवारपर्यंत (ता. ६) उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहू शकते, असेही हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59795 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..