‘संयुक्त गट ब’ची परीक्षा तत्काळ घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘संयुक्त गट ब’ची परीक्षा तत्काळ घ्या
‘संयुक्त गट ब’ची परीक्षा तत्काळ घ्या

‘संयुक्त गट ब’ची परीक्षा तत्काळ घ्या

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब परीक्षा २०२०’ या परीक्षेची भरती प्रक्रिया दोन वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांना नैराश्याने ग्रासले आहे. या एकाच परीक्षेचा अभ्यास किती काळ करावा, याला मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तत्काळ मुख्य परीक्षा घ्यावी, या मागणीसाठी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या परीक्षेची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. कोरोनामुळे ही परीक्षा चार वेळा सातत्याने पुढे ढकलली होती. पूर्व परीक्षा ४ सप्टेंबर २०२० रोजी झाली. त्यानंतर एमपीएससीने या पूर्व परीक्षेच्या तीन उत्तरपत्रिका जाहीर केल्या, त्यासोबतच काही प्रश्न रद्द केले. त्यामुळे वाद झाल्याने विद्यार्थ्यांनी न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली. परिणामी, जानेवारी अखेर होणारी मुख्य परीक्षा तीन महिन्यांपासून रखडली आहे. तसेच, या प्रकरणी एकाही न्यायालयात याबाबत सुनावणी झालेली नाही. त्यात आता न्यायालयाला ७ मे पासून सुट्या लागणार आहेत. त्यामुळे पुन्हा परीक्षा लांबणीवर पडणार आहे. न्यायालयाने या भरती प्रक्रियेबाबत कोणताही मनाई आदेश काढला नाही. एमपीएससीने मुख्य परीक्षा तत्काळ घ्यावी, असे प्रवीण मुंडे या विद्यार्थ्यांसह मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांकडून आलेल्या हरकतींवर तज्ज्ञाचा अभिप्राय घेऊन एमपीएससी उत्तर तालिका अंतिम करते. एमपीएससी ही एक घटनात्मक संस्था असून त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अंतिम उत्तर तालिकेमुळे कोणाचेही कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. कारण, जे प्रश्न आयोगाने रद्द केले आहेत, ते रद्द केलेले प्रश्न आयोगाने एकूण प्रश्नातून बाद केले आहेत. म्हणजेच परीक्षेत १०० प्रश्न १०० गुणांसाठी होते. आयोगाने ५ प्रश्न रद्द केल्यामुळे ती परीक्षा ९५ प्रश्न ९५ गुणांसाठी झाली.
- पवन खांदलकर, अमित देशमुख विद्यार्थी

एमपीएससीने प्रश्न रद्द केल्याने माझ्यासारख्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे न्यायासाठी आम्ही याचिका दाखल केली आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठीच अभ्यास करत आहोत. जर मध्येच परीक्षा झाली तर आमच्यावर अन्याय असेल. निकाल आमच्या बाजूने लागला, तर परीक्षा रद्द होऊ शकते. न्याय मागणे हा आमचा हक्क आहे. कोणाला आमचा विरोध नाही. न्यायाची लढाई लढत आहोत.
- सूरज पवार, विद्यार्थी/याचिकाकर्ते

एमपीएससी म्हणते...
ही परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत आहे. अंतिम निर्णय झाल्यावरच परीक्षेची तारीख
जाहीर केली जाईल, असे थेट एमपीएससीने १७ एप्रिल रोजीच ट्विटरवर जाहीर केले आहे.

विद्यार्थी म्हणतात...
- या परीक्षेचे राजकारण केले जात आहे
- परीक्षा लांबल्याने ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान
- अनेक विद्यार्थी नैराश्यात
- परीक्षा घेण्यासाठी एमपीएससीने तत्काळ कार्यवाही करावी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59833 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top