
मनसेच्या शहराध्यक्षासह ८५० जणांना नोटीस
पुणे, ता. ३ ः राज ठाकरे यांनी चार एप्रिलपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविण्याबाबत दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसही ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यादृष्टीने पोलिसांनी मनसेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांसह ८५० कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे.
ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरे व जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी बुधवारी (ता.४) मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. आतापर्यंत राज्यात १३ हजार लोकांना १४९ कलमा अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. तर पुण्यातील मनसेच्या ८५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला, तर कडक कारवाई करण्याचा इशारा राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अशा नोटिशींना घाबरत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा लावण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. आत्तापर्यंत पोलिसांनी आमच्या ८५० कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे.
- साईनाथ बाबर, पुणे शहराध्यक्ष, मनसे
पोलिसांकडून नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ज्या-ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्या-त्या सर्व गोष्टी पोलिस करतील.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59834 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..