
राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी ः पासलकर
पुणे, ता. ३ : ‘‘मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. तसेच राज्य सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,’’ अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय समन्वयक विकास पासलकर यांनी केली आहे.
पासलकर म्हणाले, ‘‘राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, असा इतिहासाचा दिलेला दाखला चुकीचा आणि महाराष्ट्राची दिशाभूल करणारा आहे. खोटा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘राज ठाकरे हे जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम करीत आहेत. संभाजी महाराज यांनी रायगडावर छत्रपती महाराज यांची समाधी बांधली. त्यानंतर पेशवाईच्या कालखंडात समाधीकडे आणि रायगडाकडे दुर्लक्ष झाले. पुढील काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन छत्रपतींच्या समाधीचा शोध घेतला. त्यांनी आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून समाधीचे पूजन केले. महात्मा फुले यांनी शिवजयंतीही सुरू केली. त्यानंतर कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार करण्याचे नियोजन केले. त्यापूर्वी शाहू महाराजांनी पुण्यातील शिवाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारले. शाहू महाराजांनी शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी शिवाजी फंड नावाने गोळा करण्याची कल्पना सुचवली. त्यासाठी लोकमान्य टिळक यांनी जनतेकडून ८० हजार रुपयांचा निधी उभारला. परंतु या निधीतून जीर्णोद्धार झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत लोकमान्य टिळक यांचे खापर पणतू यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59835 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..