
''स्वाधार''च्या लाभाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
पुणे, ता. ४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ एप्रिलअखेर विद्यार्थ्यांना देण्यात येणार होता. मात्र, ट्रेजरी (कोषागार) विभागात बिले अडकली असल्याने अद्यापही विद्यार्थ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झाला नाही. त्यामुळे नेमका लाभ कधी मिळणार?, असा प्रश्न लाभार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
स्वाधार योजनेचा लाभ मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांनी गेल्या दोन आठवड्यांपूर्वी समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात एप्रिलअखेर पैसे जमा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. त्यामुळे याची जबाबदारी घेऊन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रेजरी विभागातीलही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करून दिलेल्या वेळेत लाभ देणे अपेक्षित होते. परंतु त्यांच्या कामाचे अपयश झाकण्यासाठी ट्रेजरी विभागाकडे बोट दाखवून हात वर केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून तत्काळ लाभ द्यावा, अशी मागणी सुशील मेश्राम या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांची आहे.
समाज कल्याण विभागाने २०२०-२१च्या ७५ आणि २०२१-२२ च्या ३५ विद्यार्थ्यांना ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता विश्रांतवाडीतील कार्यालयात लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, अशी सूचना फोनद्वारे दिली. त्यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करणार आहोत, असे सांगून विद्यार्थ्यांचे फोटो काढले. पैसे खात्यावर जमा होतील, असे सांगण्यात आले. मात्र, अद्यापही एक रुपया जमा झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना हक्काचा लाभ तत्काळ देण्यात यावा, असे काजल वाघमारे, सुमीत शेजुळे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
दोन वर्षांपासून एकही हप्ता मिळाला नाही
अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ देण्यात येतो. गेल्या दोन वर्षांपासून २०२०-२०२१ आणि २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना या योजनेच्या लाभाचा अजून एकही हफ्ता मिळाला नाही.
योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असे सांगून कार्यालयात बोलावले. पैसे खात्यावर जमा होतील, असे सांगितले होते. मात्र ते नेहमीप्रमाणे केवळ आश्वासन ठरले. विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार देखील केला जात नाही.
- स्वाती म्हसुरे, विद्यार्थ्यांनी
स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे. बिले ट्रेजेरीमध्ये असून विद्यार्थ्यांना मदत मिळेल.
- संगीता डावखर, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59901 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..