
पुण्याला १५ जुलैपर्यंत पाणी पुरणार
पुणे, ता. ४ : खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये आजअखेर ९.९१ अब्ज फूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. या प्रकल्पामध्ये पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे दोन टीएमसीने पाणीसाठ्यात घट झाली आहे. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.
पुणे शहराची पाण्याची गरज सुमारे दीड टीएमसी इतकी आहे. परंतु, उपनगरांमध्ये नागरीकरणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे महापालिकेला त्यापेक्षा अधिक पाणी घ्यावे लागत आहे. उच्च न्यायालयाने समाविष्ट २३ उपनगरांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. शहरालगतच्या अन्य उपनगरांमध्येही खासगी टॅंकरने पाणी घेतले जात आहे.
उन्हाळी हंगामासाठी आवर्तन
खडकवासला धरणातून दौंड नगरपालिका आणि ग्रामीण भागातील काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीसाठ्याच्या उपलब्धतेनुसार एप्रिल ते जूनच्या मध्यापर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन दिले जाते. सध्या उन्हाळी पिकांसाठी पहिलेच आवर्तन सुरू आहे. त्यासाठी उजवा मुठा कालव्यातून प्रतिदिन एक हजार १४८ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तसेच, ‘जलसंपदा’कडून दुसरे आवर्तन देण्याचेही नियोजन आहे. मागील काही वर्षांतील आकडेवारीनुसार दुसऱ्या आवर्तनामध्ये तीन ते साडेपाच टीएमसीपर्यंत पाणी सोडले आहे.
पुणे शहराची लोकसंख्या (१ जुलै २०२० नुसार) ः ५३.१२ लाख
तरती लोकसंख्या ः २.६५ लाख
आजअखेर खडकवासला धरणातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
टेमघर ०.४५ (१२.१५ टक्के)
वरसगाव ४.५९ (३५.७७ टक्के)
पानशेत ४.०८ (३८.३० टक्के)
खडकवासला ०.८० (४०.३५ टक्के)
खडकवासला प्रकल्पातील एकूण पाणीसाठा
४ मे २०२२ अखेर ः ९.९१ टीएमसी (३४ टक्के)
४ मे २०२१ अखेर ः ११.७६ टीएमसी (४०.३५ टक्के)
भामा आसखेड ः ३.०९ टीएमसी (४०.२७ टक्के)
पवना ः २.९७ टीएमसी (३४.९६ टक्के)
पुणे शहरासाठी खडकवासला प्रकल्पामध्ये १५ जुलैपर्यंतचा पाण्याचा कोटा राखीव ठेवला आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा कमी केलेला नाही किंवा कोणतीही कपात करण्यात येणार नाही. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येणार असून, त्यानंतर उर्वरित पाणी शेती आणि उद्योगासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- संजीव चोपडे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग
महापालिकेकडून पाच वर्षांतील पाणीवापर (टीएमसीमध्ये)
२०२०-२१...२०.६२
२०१९-२०...१८.२४
२०१८-१९...१७.२२
२०१७-१८...१८.७१
२०१६-१७...१६.७१
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59973 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..