एकत्रित प्रयत्नांतून नाट्यगृहे सुधारू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकत्रित प्रयत्नांतून नाट्यगृहे सुधारू
एकत्रित प्रयत्नांतून नाट्यगृहे सुधारू

एकत्रित प्रयत्नांतून नाट्यगृहे सुधारू

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः शहरातील नाट्यगृहांची अवस्था गंभीर झाली असली तरी या समस्या हाताबाहेर गेलेल्या नाहीत. रंगकर्मी, प्रशासन, प्रेक्षक अशा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून या समस्या सुटू शकतात, असे मत रंगकर्मी आणि नाट्यक्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. तसेच, ही नाट्यगृहे बांधताना किंवा त्यांचा विकास करताना रंगकर्मींना फारसे विश्वासात घेतले जात नाही. परिणामी नाटकासाठी आवश्यक सुविधा येथे उपलब्ध होत नाही. त्यामुळे नाट्यगृहांसंबंधी प्रश्नांमध्ये आम्हाला विश्वासात घेतले जावे, अशी अपेक्षा रंगकर्मींना व्यक्त केली.
अभिनेते विजय पटवर्धन म्हणाले, ‘‘नाट्यगृहे बांधताना ती सुसज्जच बांधली जातात. परंतु, वापर करताना त्या सुविधांची हेळसांड होत जाते. यासाठी देखभालीची व्यवस्था चोख असणे गरजेचे आहे. तसेच, काही वेळा या सुविधांचे नुकसानही त्यांचा वापर करणाऱ्यांकडूनच केले जाते. अशावेळी प्रत्येक प्रयोगानंतर देखभाल करणाऱ्या यंत्रणेने नाट्यगृहातील प्रत्येक गोष्ट पूर्वस्थितीतच आहे का, याची खातरजमा करूनच संबंधित नाट्यसंस्थेला नाट्यगृह सोडण्याची परवानगी द्यायला हवी. यामुळे नुकसान करणाऱ्या घटकांचा शोध लागेल आणि त्यांच्याकडून नुकसानाची भरपाई घेणेही शक्य होईल.’’
या नाट्यगृहांतील प्रत्येक किरकोळ दुरुस्तीसाठीही महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाला भवन व विद्युत विभागावर अवलंबून राहावे लागते. त्यात बराच वेळ जातो. यावर उपाय म्हणून सांस्कृतिक विभागाकडे अथवा नाट्यगृहाच्या व्यवस्थापन समितीकडे थेट काही निधी देण्याची तरतूद केल्यास या किरकोळ समस्यावर तत्काळ तोडगा निघू शकेल, असा उपाय नाट्य व्यवस्थापक समीर हंपी यांनी सुचवला.

उपनगरातील नाट्यगृहांना नियमित नाटकांचे वळण नाही म्हणून गर्दी होत नाही, गर्दी नाही म्हणून सुविधा नाही आणि सुविधा नाहीत म्हणून नाटके होत नाहीत, असे हे दुष्टचक्र आहे. हे मोडण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. नियमित प्रयोग करणाऱ्या रंगकर्मींनी महिन्यातील एक प्रयोग या नाट्यगृहात करावा. तेथील स्थानिक प्रेक्षकांना सवलतीच्या दरात तिकिटे द्यावी. सरकारच्या स्पर्धांच्या आयोजन या नाट्यगृहांमध्ये करण्यात यावे. या प्रकारची पावले उचलल्या गेल्यास हे चक्र मोडले जाईल आणि उपनगरातील नाट्यगृहे वापरात येतील.
- मोहन कुलकर्णी, संचालक, मनोरंजन संस्था

मध्यवर्ती भागातील
नाट्यगृहांसाठी...
- दुरुस्तीसाठी सांस्कृतिक विभागाकडे राखीव निधी असावा, त्यामुळे तत्काळ दुरुस्ती करणे शक्य
- प्रत्येक नाट्यप्रयोगानंतर नाट्यगृहाच्या परिस्थितीची पाहणी, त्यामुळे एखाद्या नाट्यसंस्थेकडून नुकसान झाले असल्यास त्याचा शोध लागून भरपाई घेणे शक्य
- देखभालीचे कंत्राट असलेल्या कंपनीच्या कामाची नियमित तपासणी
- वातानुकूलित यंत्रणा, ध्वनिव्यवस्था, प्रकाशव्यवस्था यांच्या अवस्थेचा नियमित आढावा
- मूलभूत बदल करताना रंगकर्मींच्या सूचनांचा विचार

उपनगरातील नाट्यगृहांसाठी...
- नाट्यगृहाच्या परिसरात कार्यशाळांचे आयोजन
- नवोदित कलाकारांना सवलतीत प्रयोग करण्यासाठी आमंत्रण
- नाट्यगृहाच्या आवारातील हॉल अथवा मोकळ्या जागेचा नाटकांच्या तालमीसाठी वापर
- सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धांचे आयोजन
- प्रत्येक व्यावसायिक संस्थांकडून दर महिन्यात एका प्रयोगाचे आयोजन
- स्थानिक प्रेरकांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलतीच्या दरात तिकिटे
- संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमांचे आयोजन

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60014 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top