पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तक
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तक

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तक

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : राज्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तब्बल पाच कोटी ४० लाख ९० हजार ७०६ मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १३ जून रोजी सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके असतील, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

‘बालभारती’च्या गोरेगाव भांडारात पाठ्यपुस्तकांच्या वितरण करणाऱ्या वाहनांना गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखविला आणि राज्य सरकारतर्फे समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांच्या वितरणाला बुधवारपासून सुरवात झाली. ‘‘शाळेच्या पहिल्याच दिवशी हातात कोरी करकरीत पाठ्यपुस्तके मिळण्याचा आनंद वेगळाच असतो. याच विचाराने यंदा नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके असतील, याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे’’, असेही गायकवाड यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे. तसेच पाठ्यपुस्तके वेळेत विद्यार्थ्यांच्या हाती द्यावीत, असे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, कटक मंडळे तसेच अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) दिली. ‘बालभारती’च्या अन्य विभागीय भांडारातूनही हे वितरण सुरू केले आहे. तसेच, खुल्या बाजारात विक्रीसाठी तीन कोटी २९ लाख ३८ हजार ७०० पाठ्यपुस्तकांचे वितरण केले आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील बालभारतीच्या भांडारात झालेल्या कार्यक्रमात शिक्षण विभागातील प्रकल्प संचालक कैलास पगारे, ‘बालभारती’चे नियंत्रक विवेक गोसावी, मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी इंदरसिंग गडाकोटी, शिक्षण निरीक्षक देविदास महाजन उपस्थित होते.

पुण्यात पाठ्यपुस्तक वितरणाचा प्रारंभ
पुण्यातील बालभारती भांडारात समग्र शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांच्या वितरणास राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर, ‘बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील, वित्त व लेखा
अधिकारी भारती देशमुख, अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी उज्ज्वला ढेकणे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60110 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top