
आयसोप्रोपाईल अल्कोहोलमुळे औषध निर्माण क्षेत्राला धोका
पुणे, ता. ४ : सध्या निर्माण होणाऱ्या औषधांपैकी तब्बल ८८ टक्के औषधांमध्ये कच्चा माल म्हणून वापरात येणारे ‘आयसोप्रोपाईल’ अल्कोहोल, हे ‘नॉन-आयपी ग्रेड’ असून, ही औषधे सेवन करणाऱ्यांबरोबरच देशातील औषध निर्माण क्षेत्रासही धोकादायक आहेत.
औषधांमध्ये सर्रास वापरले जाणारे हे आयसोप्रोपाईल अल्कोहोल हे सामान्यतः आपल्या घरांत, कार्यालयांत, सिनेमा हॉलमध्ये, हॉटेल्समध्ये तसेच शॉपिंग मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणाऱ्या हॅन्ड सॅनिटायझरमधील महत्त्वाचा घटक आहे.
भारतात औषध निर्मिती क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या एक लाख मेट्रिक टन आयसोप्रोपाईल अल्कोहोलपैकी केवळ १२ टक्के आयसोप्रोपाईल अल्कोहोल हे आयपी ग्रेड व औषध निर्माण गुणवत्तेचे असते. उर्वरित नॉन-फार्मा ग्रेड आहे, असे निदर्शनास आले आहे.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात तंत्र अधीक्षक पदावर काम केलेल्या व या क्षेत्रातील जाणकारांपैकी एक असलेल्या विजयकुमार संघवी यांच्या मते, “देशातील ‘ड्रॅग अँड कॉस्मेटिक ॲक्ट’च्या दुसऱ्या भागातील १६व्या कलमानुसार औषध निर्मितीतील ‘आयपी ग्रेडच्या आयसोप्रोपाईल अल्कोहोल’बद्दलचे नियम ठळक आहेत. वास्तवात मात्र ‘नॉन आयपी ग्रेड’चे आयसोप्रोपाईल अल्कोहोल वापरले जाते.”
“औषधांत वापरले जाणारे हे ‘नॉन आयपी ग्रेड’चे ‘आयसोप्रोपाईल अल्कोहोल यूव्ही ॲबसॉर्बन्स टेस्ट’ (अतिनील अवशोषण चाचणी), ‘बेन्झीन अँड आर सबस्टन्स’, ‘नॉन वोलाटाईल रेसिड्यू’ (अस्थिर पदार्थ) तसेच ‘ॲसिडिक’ (आम्लता) तसेच, अल्कलाईन (क्षारता) या गुणवत्तेच्या कसोटीवर मागे पडतात. त्यामुळे कमी दर्जाचा कच्चा माल वापरून सुमार दर्जाची औषधे बनवली जातात,” असेही ते म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60138 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..