
बनावट दस्तऐवजाद्वारे म्हाडाची फसवणूक
पुणे, ता. ४ ः बनावट दस्तऐवजाद्वारे महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची (म्हाडा) मालकीहक्क असलेल्या जागेवर अतिक्रमण करीत जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार महर्षीनगर येथे घडला असून, याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
साखराभाई दिनश इराणी (रा. महर्षीनगर), फारेख माणेख घडीयाली (रा. लष्कर), अली अकबर जाफरी (रा. स्वारगेट), ललित खेमचंद ओसवाल (रा. भवानी पेठ) यांच्यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ‘म्हाडा’चे कार्यकारी अभियंता दिनेश श्रीधर श्रेष्ठ यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महर्षीनगरमधील सर्व्हे क्रमांक ६९७ मधील ११ एकर ३६ गुंठे जागा रशीद खुदाराम इराणी यांच्या मालकीची होती. म्हाडाने नियमानुसार रशीद यांच्याकडून सदर जागेचा ताबा घेतला होता. त्यानंतर नोव्हेंबर १९७० मध्ये रशीद इराणी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार असलेले दारा इराणी, दिनश इराणी, पार्डून इराणी, खोदाराम इराणी यांनी या जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल देताना जून १९८३ मध्ये या वारसांना म्हाडाने भरपाई द्यावी, असा आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी म्हाडाला दिला होता. त्यानुसार म्हाडाने कायदेशीररीत्या वारसांना भरपाई रक्कम दिली होती.
भरपाई दिल्यानंतर म्हाडाने संबंधित जागेवर टप्प्याटप्याने विकासात्मक प्रक्रिया सुरू करून इमारती बांधल्या आहेत, तर त्या जागेपैकी काही जागा मोकळी आहे. १ मे २०२२ रोजी म्हाडाच्या मोकळ्या जागेत ललित ओसवाल यांनी बेकायदा रस्ता खोदला, तसेच जागेच्या परिसरात तारेचे कुंपण घातल्याची माहिती म्हाडा प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर म्हाडा प्रशासनाने पाहणी केली. तेव्हा, रशीद इराणी यांच्या वारसदारांसह अन्य व्यक्तींनी संगनमत करून जागेचे बनावट दस्तऐवज तयार करून म्हाडाच्या जमिनीची मालकी घेतल्याचे निदर्शनास आले. बनावट दस्तऐवजांचा वापर करून जागेवर ताबा मिळविण्यासाठी त्यांनी दिवाणी न्यायालयातही बनावट दस्त सादर करून न्यायालय व राज्य सरकारची फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव करीत आहेत.
--------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60193 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..