
वैकुंठच्या स्वच्छतेवरून ढकालढकली सुरूच
पुणे, ता. ५ : वैकुंठ स्मशानभूमीसाठी महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. तरीही तेथे अस्वच्छता आहे. स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करण्याबाबत क्षेत्रीय कार्यालय आणि ठेकेदार एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकतात. त्यामुळे स्मशानभूमीचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात विद्युत विभागाकडे तक्रार केली जाणार असल्याचे कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर यांनी सांगितले.
शहरातील स्मशानभूमीतील असुविधा, सुरक्षा, अस्वच्छतेचा प्रश्न ‘सकाळ’ने चव्हाट्यावर आणून येथील कामकाजाबद्दल प्रश्न उपस्थित केले. वैकुंठ स्मशानभूमीतील वृत्ताची दखल घेऊन आशिष महाडदळकर यांनी तेथे पाहणी केली. विद्युत दाहिनीच्या मागे पडलेला कचरा उचलण्यात आला. मात्र, स्मशानभूमीच्या इतर भागात कचरा विखुरलेला आहे. अंत्यसंस्कारातील कपडे, अंथरूण पांघरून, गाद्या, फुलाच्या हाराची टोपली, मडके यासह दारूच्या बाटल्या अद्यापही तशाच पडून आहेत. हा कचरा क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी उचलला नाही.
स्मशानभूमीतील रस्ते स्वच्छ करण्याचे काम क्षेत्रीय कार्यालयाकडे आहे. तर विद्युत दाहिनीसह शेडमधील व त्याच्या आजूबाजूचा कचरा संबंधित ठेकेदाराने उचलणे आवश्यक आहे. त्याबाबत ठेकेदारास विद्युत विभागाने नोटीस बजावूनसुद्धा त्याने कचरा उचलला नाही. याविरोधात आम्ही विद्युत विभागाकडे तक्रार करणार आहोत.
आशिष महाडदळकर, सहाय्यक आयुक्त, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60204 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..