
दिवाळीनंतरच पुणे महापालिकेची निवडणूक
पुणे, ता. ४ : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे शहरातील राजकीय वर्तुळात आज (ता.४) दिवसभर उलटसुलट चर्चेला उधाण आले. मात्र, एक महिन्यांवर येऊन ठेपलेला पावसाळा आणि प्रशासकीय मुदत चार महिन्यांचा कालावधी असल्यामुळे दिवाळीनंतरच पुणे महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता अधिक असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे
सर्वोच्च न्यायालयाने मुदत संपलेल्या महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया येत्या १५ दिवसात सुरू करण्याचे आदेश आज दिले. महापालिकेच्या सभागृहाची मुदत १४ मार्चला संपुष्टात आली. तर महापालिकेकडून फेब्रुवारी महिन्यात प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करून आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविले होते. त्यात आयोगाने त्रुटी काढल्यामुळे त्यामध्ये दुरुस्ती करून मार्च महिन्यात महापालिकेकडून आयोगाला अंतिम मान्यतेसाठी प्रभाग रचना सादर केली. मात्र, राज्य सरकारकडून त्यास मान्यता देऊन निवडणूका घेण्याऐवजी ती प्रभाग रचना रद्द करून पुन्हा नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे एप्रिल महिन्यात महापालिकेला आदेश दिले. त्यामुळे निवडणूका पुढे जाणार हे स्पष्ट झाले होते.
तर निवडणूका या जुलै महिन्यात
न्यायालयाने पंधरा दिवसात निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यास पंधरा दिवसांची मुदत आयोगाला दिली आहे. ही मुदत पाहता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही मुदत आहे. न्यायालयाच्या आदेशावरून आयोगाने जरी निवडणूका घेण्याची तयारी दर्शविली, तर आचारसंहितेचा कालावधी किमान ३५ दिवसांचा द्यावा लागणार आहे. तो विचारात घेतला तर निवडणूका या जुलै महिन्यात घ्याव्या लागतील. या काळात सर्वत्र पावसाळा सुरू होतो. पावसाळ्यात निवडणूका घेणे शक्य नाही, त्यामुळे न्यायालयाने आदेश दिले असले, तर निवडणूका या दिवाळीपर्यंत लांबण्याची शक्यता अधिक आहे, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
इच्छुकांच्या पदरी सध्या तरी निराशाच
पुणे महापालिकेवर १४ मार्चपासून प्रशासकीय राज सुरू झाला आहे. कायद्यातील तरतुदीनुसार जास्तीत जास्त सहा महिने प्रशासक नेमता येतो. महापालिकेतील प्रशासकाची मुदत ही सप्टेंबरपर्यंत आहे. त्यास पुरेसा अवधी आहे. हे विचारात घेतले, तर पुणे महापालिकेची निवडणूका सप्टेंबरपर्यंत होऊ शकतात, हे देखील त्यामागे कारण असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या पदरी सध्या तरी निराशाच पडणार असल्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60208 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..