
रोगापेक्षा इलाज भयंकर!
पुणे, ता. ५ ः नळ स्टॉप चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने रात्रीतून पाळंदे कुरिअरच्या गल्लीत दोन ठिकाणी बोलार्ड लावले आहेत. त्यामुळे जोशी रस्त्यावरून निसर्ग हॉटेलकडून कर्वे रस्त्याकडे जाणाऱ्या रिक्षा व चारचाकी वाहनांचा रस्ता बंद झाल्याने त्यांना एक तर परत फिरून निसर्ग हॉटेलकडून डावीकडे वळून नळस्टॉप चौकात जावे लागत आहे. किंवा स्पंदन सोसायटीच्या कोपऱ्यावरून वळून रेस्कॉन गल्लीतून थेट पटवर्धन बागेच्या सिग्नलकडे जावे लागत असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत.
पुणे महापालिकेने नळ स्टॉप चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल उभारला. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर कोथरूडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत.
नेमके काय झाले?
- महापालिकेने बुधवारी (ता. ४) रात्री पाळंदे कुरिअरच्या गल्लीत कर्वे रस्ता आणि स्पंदन सोसायटी येथे बोलार्ड लावले
- या दरम्यानची निवासस्थान, बँक, कुरिअरला फटका बसला
- पाडळे रस्त्यावरून कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनांनी थेट नळ स्टॅप चौकातून डावीकडे वळणे आवश्यक
- पण दुचाकी व चारचाकी वाहने जोशी रस्त्याने वळतात
- पुढे हा रस्ता लागू बंधू येथे बोलार्ड लावून बंद केला होता
- त्यामुळे ही वाहने तेथून पुढे जाऊन पाळंदे करिअरच्या गल्लीतून कर्वे रस्त्यावर जात होती
- पण आता हा रस्ताही चारचाकीसाठी बंद केला आहे
चारचाकी वाहनांनी
जोशी रस्ता टाळावा
नळ स्टॉपचा सिग्नल टाळण्यासाठी चारचाकी, तीनचाकी चालक जोशी रस्त्याने कर्वे रस्त्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा रस्ता चारचाकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी थेट नळस्टॉप चौकातूनच कोथरूडच्या दिशेने जावे. जोशी रस्त्यावरून गेल्यास कोथरूडला जाण्यासाठी रेस्कॉन गल्लीतून पटवर्धन बागेच्या सिग्नलला जावे लागेल. तेथून मोठा वळसा घेऊन करिष्मा सोसायटी चौक तेथे जावे लागेल. त्यामुळे चारचाकी, तीनचाकी वाहनांनी जोशी रस्ता टाळावा.
बँकेला बसला फटका
पाळंदे करिअरच्या गल्लीत भारतीय स्टेट बँकेचे (एसबीआय) विभागीय कार्यालय आहे. तेथे दिवसभर वर्दळ असते, अनेक नागरिक कारने बँकेत येतात, पण त्यांना आता मोटार लांब लावावी लागत आहे. तसेच बँकेत जमलेल्या रोख रकमेचे हस्तांतर करण्यासाठी चारचाकी वाहने येतात. पण आता हा रस्ता बंद केल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात आज महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली आहे.
रेस्कॉन गल्लीतील कामासाठी आम्हाला वारंवार यावे लागते, पण पाळंदे कुरिअरचा रस्ता अचानक बंद केल्याने गोंधळ उडाला. पुढच्या वेळी दुचाकीच घेऊन यावे लागणार आहे. तसेच हा रस्ता अरुंद असला तरी येथे इंडस्ट्रिअल एरिया असल्याने ट्रक, टेंपो येतात. त्यात आता इतर भागातील वाहतूक येथे वळणार असल्याने कर्वे रस्त्याऐवजी छोट्या गल्ल्यांमध्ये वाहतूक कोंडी होईल.
- श्यामसुंदर वायचळ, नागरिक
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60292 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..