
साठीतील तरुणाकडून १००० वेळा सिंहगड सर
पुणे, ता. ५ : छंद जोपासायला वयाची अट नसते. हे सिद्ध करून दाखविले आहे नाना पेठेतील साठीतील एका तरुणाने. रिक्षाचालक असलेले बाळकृष्ण वाघचौरे या आजोबांनी तब्बल एक हजार वेळा सिंहगड सर केला आहे. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वाघचौरे यांनी नुकतीच १००० वी सिंहगड वारी पूर्ण केली. यामुळे सह्याद्री ट्रेकिंग फाउंडेशन आणि सिंहगड परिवारातर्फे त्यांचा सत्कार केला आहे. ते ऑक्टोबर २००८ पासून गड किल्ल्यांची भटकंती करत आहेत. पुणे, नाशिक या भागात विविध गड-किल्ल्यांचे सर त्यांनी केले आहे. याबाबत वाघचौरे यांनी सांगितले, ‘‘गिर्यारोहण, गड किल्ल्यांची भटकंतीचा छंद असल्याने वेळ मिळेल तसे गड-किल्ले सर करत होतो. त्याचबरोबर रिक्षा व्यवसाय असल्याने हुजूरपागा शाळेत विद्यार्थ्यांना सेवा उपलब्ध करत आहे. कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने कामही बंद झाले. त्यामुळे या वेळेचा वापर कसा करायचा हा प्रश्न होता. त्यानंतर गड-किल्ल्यांच्या भ्रमंतीत वाढ होऊ लागली आणि सिंहगड वारीचे प्रमाण वाढले. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. शिवाय शिवप्रेमी, पर्यटकांना भेटताही येते.’’
सध्याच्या जगात ताण-तणाव वाढत आहे. त्यात तरुण पिढीने आपले छंद जपणे गरजेचे आहे. दैनंदिन कामासोबत छंद जपण्यासाठी वेळेची नाही तर इच्छाशक्ती गरज असते. मी या वयातही व्यवसाय सांभाळून छंद जोपासत आहे. त्यामुळे कोणती ही गोष्ट साध्य करण्यासाठी वयाची किंवा वेळेची अडचण नसते.
- बाळकृष्ण वाघचौरे
एकाच दिवसात तीन गड सर
बाळकृष्ण वाघचौरे यांनी सिंहगड, राजगड आणि तोरणा हे तीन गड एकाच दिवशी सर केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी पुणे व नाशिक येथील लोहगड, विसापूर, वैराट गड, लोणावळा ते राजमाची, कुर्दूगड, हरिश्र्चंद्र गड, जंजिरा, सिंधुदुर्ग, लिंगाणा, ब्रम्हगिरी, दुर्गभांडार, हरिहर गड, भास्कर गड असे अनेक गड-किल्ले सर केले आहेत. तसेच त्यांनी हिमालयातील ट्रेकिंगच्या मोहिमा देखील केल्या आहेत.
62141
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60302 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..