
एसटी आगारांची पाण्याच्या बाटलीच्या किमतीचे फलक लावण्यास उदासीनता
पुणे - एसटी आगारांमध्ये (ST Depot) ‘नाथजल’ (Nathjal) ही पाण्याची बाटली (Water Bottle) विक्रेत्यांकडून सर्रास २० रुपयांना विकली (Selling) जात आहे. त्यांच्यावर कारवाई (Crime) करण्याबाबत एसटी महामंडळ उदासीन असून, आगारांमध्ये मोठ्या अक्षरात बाटलीच्या किमतीचे फलकही लावलेले नाहीत.
एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने सुरू केलेल्या ‘नाथजल’ या योजनेचा फायदा खासगी विक्रेत्यांनाच होत आहे. पुणे स्थानक, वाकडेवाडी (शिवाजीनगर), स्वारगेट या एसटी आगारात याची पाहणी केल्यावर छापील किमतीपेक्षा अधिक पैसे घेऊन नाथजलची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ‘सकाळ’ ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावेळी एसटी अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करून, मोठ्या अक्षरात फलक लावले जातील असे सांगितले होते. मात्र, याबाबत अद्याप काहीच कार्यवाही झाली नसल्याचे आगारातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच, स्टॉलवर मिळणाऱ्या खाद्य पदार्थांची विक्रीदेखील छापील किमतीपेक्षा अधिक केली जात असल्याचे दिसून आले.
दुकानात एक, बसमध्ये वेगळेच!
वाकडेवाडी आगारात थेट विक्रेत्याच्या दुकानात पाणी बाटली घेतल्यावर त्याने प्रामाणिकपणे १५ रुपये घेतले, तर आगारात आलेल्या बसमध्ये जाऊन विक्री करणाऱ्या फिरत्या विक्रेत्यानेही १५ रुपये आकारल्याचे दिसून आले. मात्र, काही विक्रेते ग्राहक बघून नाथजलची २० रुपयांना विक्री करतानाही दिसून आले. स्वारगेट आगारात नाथजल २० रुपयांनाच विक्री होत असल्याचे दिसून आले.
‘नाशिक ते स्वारगेट असा प्रवास करत होतो. यादरम्यान, नाथजलची पाणी बाटली २० रुपयांना विकत घेतली. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे थेट पुढच्या प्रवासाला जात आहे.’
- सयाजी पांढरे, प्रवासी
अधिकारी म्हणतात...
नाथजलची विक्री १५ रुपयांनाच करावी, असे संबंधित आगारातील आगारप्रमुखांकडून सांगितले जात आहे. शिवाय, कंपनीकडून फलक लावले जाणार आहेत. मात्र, त्यासाठी १० ते १५ दिवसांचा वेळ लागणार आहे. अद्याप कोणत्याही विक्रेत्यावर कारवाई केली असल्याची लेखी माहिती नाही. प्रवाशांनी लेखी तक्रार करावी, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘नाथजल’ची विक्री (एक लिटर बाटली)
महिना - महिन्यात बाटल्यांची एकूण विक्री - एसटीला मिळालेले उत्पन्न - ५ रुपये जादा आकारून खासगी विक्रेत्याला मिळालेले उत्पन्न
मार्च - २ लाख १६ हजार - २ लाख १६ हजार (प्रति बाटली मागे १ रुपया) - १० लाख ८० हजार
एप्रिल - १२ लाख ४८ हजार - १२ लाख ४८ हजार - ६२ लाख ४० हजार
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60309 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..