
पुण्यात सदावर्तेंची पोलिसांकडून चौकशी
पुणे : एसटी कामगार संघटनेच्या आंदोलनातील नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भारती विद्यापीठ पोलिसांनी गुरुवारी (ता. ५) सलग दुसऱ्या दिवशी एका गुन्ह्यात चौकशी केली. या वेळी मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेऊन सोडून दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सदावर्ते यांना बुधवारी दुपारी चौकशीसाठी बोलावून घेतले होते. त्यानंतर पुन्हा गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास चौकशीसाठी बोलावले. सुमारे दोन तास चौकशी झाली. त्यानंतर सदावर्ते हे प्रसारमाध्यमांशी न बोलता बाहेर पडले.
सदावर्ते हे त्यांच्या पत्नीसह व्हॅनिटी व्हॅनने पोलिस ठाण्यातून बाहेर पडत होते, त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी तुषार काकडे, अमर पवार, सचिन आडेकर, प्रसाद कोंडे, करण जगताप आणि गुरुनाथ चव्हाण यांना ताब्यात घेतले. याशिवाय, राजेंद्र कुंजीर, देवदास लोणकर, मल्लिनाथ गुरवे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.
सदावर्ते यांचा इनकॅमेरा जबाब
पोलिस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते यांचा ‘इन कॅमेरा’ जबाब नोंदविण्यात आला. त्यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. परंतु, नेमकी काय चौकशी झाली, याबाबत पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांनी अधिक बोलणे टाळले.
काय आहे प्रकरण
छत्रपती घराण्याची बदनामी केल्याप्रकरणी दीड वर्षांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाचे अमर पवार यांनी तक्रार दिली होती. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सदावर्ते यांना नोटीस बजावली होती. त्याबाबत जबाब नोंदविण्यासाठी सदावर्ते पोलिस ठाण्यात हजर झाले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60329 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..