
केंद्रीय प्रसारण मंत्र्यांवर विद्यार्थ्यांचा रोष
पुणे, ता. ५ : केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) भेट दिली. परंतु या भेटीदरम्यान ठाकूर यांना संस्थेतील विद्यार्थ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘देश के गददारों को, गोली मारो सालों को’ असे वक्तव्य करून सामाजिक अशांतता निर्माण केलेल्या व्यक्तीचे ‘एफटीआयआय’मध्ये स्वागत नको, अशा आशयाचे फलक हाती धरत विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने ठाकूर यांच्या दौऱ्याला विरोध दर्शविला.
ठाकूर यांच्या एफटीआयआय भेटीवेळी ‘वुई स्टँड अगेंस्ट पॉलिटिक्स ऑफ हेट’, ‘मिनिस्टर ऑफ हेट यू आर नॉट वेलकम’ अशा स्वरूपाचे फलक हातात घेत विद्यार्थ्यांनी मूक निदर्शने केली. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अपूर्व चंद्रा यांना निदर्शने करणार असल्याचे कळताच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
ठाकूर यांनी संस्थेचे पदाधिकारी आणि विभागप्रमुखांची बैठक घेतली. दरम्यान, मंत्र्यांना भेटण्याची संधी मिळावी म्हणून संस्थेच्या अध्यक्षांकडे विनंती करण्यात येत होती. अखेर ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ दिला.
विद्यार्थ्यांच्या मागण्या :
- ‘एफटीआयआय’मधील शुल्कवाढ रद्द करावी
- संस्थेने सर्वसामान्यांना परवडणारे शिक्षण द्यावे
- ‘एफटीआयआय’ला राष्ट्रीय दर्जा द्यावा
- पायाभूत सुविधा पुरवाव्यात
- ‘एफटीआयआय’चे खासगीकरण थांबवावे
- विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नये
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे यापूर्वी कधीही संस्थेत आलेले नाहीत. त्यांनी राजकीय प्रचारादरम्यान देशात धार्मिक द्वेष पसरविणारे विचार मांडले, ते आम्हाला मान्य नाहीत. त्याचा आम्ही शांततेच्या मार्गाने निषेध केला. ठाकूर यांनी आम्हाला संवाद साधण्यासाठी दोन मिनिटांचा अवधी दिला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सांगितले. सध्या संस्थेत सुरक्षा अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यात येते.
- अवंती बसर्गेकर, अध्यक्ष, एफटीआयआय स्टुडंट असोसिएशन
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60458 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..