
राज्यात उन्हाचा चटका कायम
पुणे, ता. ५ ः राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू असल्याने अनेक ठिकाणी आलेली उष्ण लाट ओसरली आहे. राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणार असून, उन्हाचा चटका कायम राहणार आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
राज्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली. सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४४.१ अंश सेल्सिअस आणि नीचांकी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे १८.५ अंश सेल्सिअस इतकी झाली. कमाल तापमानात सुरू असलेल्या चढ-उतार सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात काहीशी घट पाहायला मिळाली. दरम्यान, त्या आधी कमाल तापमान हे जवळपास ४६ अंशांपर्यंत पोचले होते. मात्र, आता तापमान हे ४० ते ४४ अंशांपर्यंत आहे. मात्र, कोकणात पारा ३१ ते ३४ अंश सेल्सिअसदरम्यान आहे.
बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे शुक्रवारी (ता. ६) येथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, रविवारपर्यंत (ता. ८) या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. यातच मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. या प्रणालीपासून विदर्भ, तेलंगण, रायलसीमा, तमिळनाडू, कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच, हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार ८ मेपासून विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60495 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..