
बॉम्बची अफवा पसरविणारे जेरबंद
पुणे, ता. ५ : पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून दहशत पसरवणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले. वाघोली आणि रांजणगाव एमआयडीसी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
भीमाजी काळे (वय ३३, रा. नावरे, ता. शिरूर) आणि सूरज मंगतराम ठाकूर (वय ३०, रा. नशेली, ता. मुखेरिया, जि. होशियारपूर, पंजाब) अशी अटक केल्यांची नावे आहेत. तीन मे रोजी दुपारी शहर पोलिस नियंत्रण कक्षास अज्ञाताचा दूरध्वनी आला. ‘महेश कवडे नावाच्या व्यक्तीने पुणे रेल्वे परिसरात बॉम्ब ठेवला आहे. तो बॉम्ब कोठे ठेवला आहे, याची माहिती हवी असल्यास सात कोटी रुपये द्या,’ अशी मागणी केली. त्यावर या प्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश शिंदे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत क्षीरसागर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रमोद कोपीकर आणि इरफान शेख यांनी लोहमार्ग आणि शहर पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने पुणे रेल्वे स्थानकात बॉम्बसदृश्य वस्तूंचा शोध घेतला. परंतु काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.
त्यानंतर पोलिसांनी दूरध्वनी करणाऱ्याच्या तपासासाठी चार पथके तयार केली. वाघोली परिसरातून भीमाजी काळे याला ताब्यात घेतले. त्याने सूरज ठाकूर याच्याकडून घेतलेल्या सिमकार्डचा वापर करून नियंत्रण कक्षास कॉल केल्याचे कबूल केले. त्यावरून पोलिसांनी ठाकूर याला रांजणगाव एमआयडीसी येथून ताब्यात घेतले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60504 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..