
२५ लाख खंडणी मागणाऱ्यास अटक
पुणे, ता. ५ : मुंबईतील कंपनीला दिलेल्या कामाचे पैसे न दिल्यास माझ्या पोरांना पाठवतो, अशी धमकी देऊन व्यावसायिकाकडे २५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २७ एप्रिल रोजी रात्री मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात घडली.
या संदर्भात श्रेणिक पुखराज ओसवाल (वय ३५, रा. मार्केट यार्ड) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विक्रांत सुरेश शिवणकर (वय ३०, रा. जगदंबा भवन रस्ता, पिसोळी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओसवाल यांनी डिसेंबर २०२१ मध्ये दिल्ली येथील इंडिया गेट येथील ‘आर्मी शो’चे काम घेतले होते. हे काम त्यांनी मुंबईतील नरेंद्र राहुरीकर यांच्या कंपनीला दिले होते. कामाच्या मोबदल्यात राहुरीकर यांना ३० लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी १५ लाख रुपये अॅडव्हान्सही दिला होता. परंतु कंपनीने व्यवस्थित काम न केल्यामुळे फिर्यादी यांनी इतरांकडून ते काम पूर्ण करून घेतले. त्यात आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांनी राहुरीकर यांना वकिलामार्फत नोटीस पाठवली होती. दरम्यान, शिवणकर याने फिर्यादीशी संबंध नसतानाही त्यांना फोन केला. राहुरीकर यांचे पैसे कधी देणार, अशी धमकी देत फिर्यादीकडे २५ लाखांची खंडणी मागितली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60570 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..