
असून अडचण, नसून खोळंबा!
प्रसाद कानडे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ ः मी हडपसरच्या भागात राहते. कुटुंबीयांसमवेत एका घरगुती कार्यक्रमासाठी मला पाषाणला जायचे होते. ज्यावेळी कॅब बुक करीत होते, त्यावेळी ती ट्रीप चालकांकडून कॅन्सल केली जात होती. तासाभरानंतर कशीबशी एक कॅब बुक झाली. पूर्वी पाच ते दहा मिनिटांत उपलब्ध होणारी कॅब आता अर्धा तासाने बुक होत आहे. आरामदायक व वेगवान प्रवासासाठी पुण्यात कॅब हा चांगला पर्याय. मात्र, आता त्याच्यावर विश्वास राहिला नसल्याचे पूजा डोईफोडे सांगतात. काहीशी अशीच भावना मयुरेश झव्हेरी यांची देखील आहे.
घरापासून पुणे रेल्वे स्थानक, विमानतळावर जाण्यासाठी कॅब उपलब्ध होते. मात्र, शहराच्या अन्य भागात जायचे असल्यास एक-दोन वेळा तरी ट्रीप कॅन्सलचा अनुभव येतो. अनेकदा गाडी बुक झाल्यावरही चालक कुठे जायचे आहे, अशी फोनवरून विचारणा करतो. आणि थेट गाडी रद्द करतो. जवळची ट्रीप रद्द करायची आणि लांबच्या ट्रिपला पसंती द्यायचा हा प्रकार आता कॅबच्या बाबतीत देखील दुर्दैवाने घडत आहे. यात प्रवाशांच्या वेळेचा विचार करणार की नाही असा प्रश्न उपस्थित होतो.
आकडे बोलतात
- पुणे आरटीओकडे सुमारे ३८ हजार कॅबची नोंद
- यातील ३२ हजार कॅबची शहरांतर्गत प्रवासी सेवा देण्यासाठी खासगी सेवा देणाऱ्या संस्थेकडे नोंद
- गेल्या दोन वर्षांत सुमारे १० हजार कॅब चालकांची संख्या घटली
- पुण्यात आता सुमारे २२ हजार कॅब धावत
का घटली कॅबची संख्या?
१) कोरोनाच्या काळात ठप्प झालेली व्यवस्था. कॅब चालकांनी फायनान्स कंपनी अथवा बँकेकडून घेतलेले कर्ज फेडू न शकल्याने जवळपास तीन ते चार हजार गाड्या जप्त झालेल्या आहेत.
२) अनेकांनी दोन वर्षांत गाडी बंदच ठेवली. आता त्यांना गाडी पुन्हा सुरू करण्यासाठी पासिंग, इन्शुरन्ससारखी कामे करावी लागतील. मात्र, त्यासाठी वीस ते पंचवीस हजार रुपयांचा खर्च आहे. तेवढी आता आर्थिक स्थिती नसल्याने गाड्या बंद ठेवून अन्य व्यवसायाकडे वळवले आहेत.
३) प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आपल्या कमिशनच्या स्ट्रक्चरमध्ये मोठे बदल केले आहे. कॅब चालकांकडून एका ट्रीपच्या बदल्यात दोन वेळा पैसे घेतले जातात. पिकअप पॉइंट हा दोन किलोमीटरचा असेल तर त्या दोन किलोमीटरचा खर्च व प्रत्येक ट्रीप १५ ते २० रुपयांचे कमिशन घेते. याला अनेक कॅब चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक जण या व्यवसायातूनच बाहेर पडले आहे.
याचा परिणाम काय?
- कॅब चालकांनी सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करून त्यांनी आपले वाहने खासगी कंपनीत लावले आहे.
- प्रवाशांना कॅब बुक करण्यासाठी अर्धा तासापर्यंत वाट पहावे लागते.
- आयटी सेक्टरमधल्या कर्मचाऱ्यांना याचा त्यात फटका. रिक्षासह अन्य वाहनांचा वापर.
- खासगी वाहनांचा देखील वापर वाढला.
मागील दोन वर्षांत सुमारे ९ ते १० हजार कॅबची संख्या घटली आहे. त्यामुळे त्याच्या उपलब्धतेवर देखील विपरीत परिणाम झाला आहे. याला विविध घटक कारणीभूत आहे. सेवा देणाऱ्या कंपनीने देखील आपल्या कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे.
- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र वाहन चालक मालक प्रतिनिधी संघ
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60698 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..